

पुणे: सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रातील इन्फ्लूएन्झासदृश आजार (आयएलआय) आणि तीव्र श्वसन संसर्ग (सारी) च्या रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील 38 टक्के रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत.
स्वाईन फ्लू, कोरोना महामारीच्या काळातही सर्वाधिक रुग्णांची नोंद पुणे जिल्ह्यात झाली होती. जिल्ह्यातील नेमकेपणाने होत असलेल्या नोंदीमुळे संख्या वाढलेली दिसत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. (Latest Pune News)
आरोग्य विभागाच्या ‘इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन पोर्टल व इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हेलन्स प्रोग्रॅम’च्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 11 जून दरम्यान महाराष्ट्रात इन्फ्लूएन्झासदृश आजारांचे (आयएलआय) एकूण 1 लाख 42 रुग्ण नोंदवले गेले होते. त्यापैकी केवळ पुणे जिल्ह्यात 54 हजार 371 रुग्ण आढळले आहेत.
याच काळात राज्यात 753 सारी रुग्ण नोंदवले गेले असून, यापैकी 597 रुग्ण पुण्यातील आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही वाढ चिंताजनक असून, यामागे हवामानातील बदल, लोकसंख्येची घनता, हवेतील प्रदूषण आणि उशिराने होणारे वैद्यकीय उपचार यांसारखे अनेक घटक कारणीभूत असू शकतात.
या शिवाय, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर व कोल्हापूर अशा विविध ठिकाणांहून नागरिक उपचारांसाठी पुण्यात येतात. त्यामुळेही रुग्णसंख्या वाढते, असे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.
आकडे काय सांगतात?
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यानंतर जळगाव (18 हजार 435) आणि अहिल्यानगर (9 हजार 903) येथे आयएलआयचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. सारीच्या रुग्णसंख्येमध्ये पुण्यानंतर सोलापूर (31) आणि नागपूर (29) यांचा क्रमांक लागतो.
हवामान बदलाच्या काळात आणि प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्यावर श्वसन विकारांमध्ये वाढ होत असते. पावसाळ्यातील दमट आणि ओलसर हवामान विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होते. या काळात सहव्याधी असलेल्या रुग्णांनी आणि वयोवृद्ध व्यक्तींनी दरवर्षी इन्फ्लूएन्झाचे लसीकरण करून घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा आणि स्वच्छतेचे पालन करावे.
- डॉ. अनिकेत देशपांडे, जनरल फिजिशियन