

पुणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या अकरावी प्रवेश प्रक्रियेतील कोटा प्रवेश प्रक्रिया संपली आहे. आजपासून कॅप प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे.
विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण करण्यात येणार आहे. तर, येत्या 26 जूनला कॅप प्रवेशातील पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Latest Pune News)
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी कोट्यातून प्रवेशासाठी एकूण 1 लाख 13 हजार 48 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यातील 60 हजार 487 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता 17 जून रोजी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाळा आणि प्रवेश प्रक्रियेचे परीक्षण करण्यात येणार असल्याचे वेळापत्रकात नमूद आहे.
तर 26 जून रोजी कॅपची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. 27 जून ते 3 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना कॅप राउंडअंतर्गत प्रवेश घ्यायचा असून, दुसर्या फेरीसाठी 5 जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
20 लाख 62 हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध
प्रवेशासाठी 9 हजार 435 महाविद्यालयांमध्ये 21 लाख 23 हजार 40 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये कॅपच्या 16 लाख 86 हजार 401 तर कोटा प्रवेशाच्या 4 लाख 36 हजार 639 जागांचा समावेश आहे. त्यासाठी 12 लाख 71 हजार 201 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. कोटाअंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॅपच्या 16 लाख 86 हजार 401 तर कोटा प्रवेशाच्या 3 लाख 76 हजार 152 अशा 20 लाख 62 हजार 553 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.