पुणे: शहरातील 21 अतिधोकादायक इमारती व वाड्यांवर लवकरच महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जाणार आहे. या इमारती पाडण्यात येणार आहे. ज्या रहिवाशांकडे पर्यायी निवासाची सोय नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा नागरिकांची महापालिकेच्यावतीने पावसाळा संपेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात निवासाची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
पुण्याच्या मध्यवर्ती भागात अनेक जुने वाडे, इमारती आहेत. या इमारती आणि वाड्यामधील मालक व भाडेकरू यांच्यात जागेवरून वाद आहेत. यातील काही प्रकरणे हे न्यायप्रविष्ट आहेत. तर काही ठिकाणी रहिवासी नसल्याची देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा इमारती व वाड्यांची देखभाल होत नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. (Latest Pune News)
यातील तब्बल 21 इमारती जीर्ण व धोकादायक बनल्या असून त्या राहण्यास अयोग्य आहेत. महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलम 160 (ब) व (क) अंतर्गत नोटीस बजावून या अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या शहरात सतत पाऊस पडत असल्याने, महापालिका या 21 मिळकतींवर तत्काळ कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
ज्यांना राहण्यासाठी दुसरी जागा उपलब्ध नाही, अशा नागरिकांची पावसाळ्यापर्यंत निवासाची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे, हे विशेष. दरम्यान, ज्या इमारतींची दुरुस्ती शक्य आहे, त्यांना दुरुस्तीचे आदेश दिले गेले असून, त्याची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याचीही तपासणी केली जात आहे.
न्यायालयीन स्थगितीमुळे थांबवावी लागते कारवाई
महापालिकेकडून दरवर्षी अशा मिळकतींचे सर्वेक्षण केले जाते आणि त्याचे ‘अतिधोकादायक, धोकादायक व कमी धोकादायक’ अशा प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. ज्यांना अतिधोकादायक श्रेणीत टाकले जाते, त्या इमारती पाडल्या जातात. या कारवाईचा खर्च संबंधित मालकांकडून वसूल केला जातो. काही वेळा ही कारवाई न्यायालयीन स्थगितीमुळे थांबवावी लागते.