

पुणे: लहरी हवामानासह रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचा फटका पहिल्या टप्प्यातील हापूस आंब्याला बसल्याने उत्पादनात तब्बल सत्तर टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात हापूसची आवक रोडावली आहे.
मात्र, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याला मोठी मागणी आहे. बाजारात गुरुवारी 4 ते 8 डझनाच्या अवघ्या ऐंशी पेट्यांची आवक झाली. मागणी मोठी असल्याने पेटीला 8 हजार ते 15 हजारांचा भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात अडीच ते चार हजार रुपये डझन या दराने आंब्याची विक्री सुरू होती.
गुढीपाडव्यादिवशी हंगामातील पहिला आंबा देवाला अर्पण करण्याची परंपरा असल्याने बाजारात हापूसला मागणी वाढली आहे. मात्र, सध्या मार्केट यार्डात केवळ 70 ते 80 पेट्यांचीच आवक होत आहे. मागील वर्षी याच काळात दररोज 2 ते 3 हजार पेट्या दाखल होत होत्या. यंदा कोकणात जास्त पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिला आणि ऑक्टोबरपर्यंत थंड हवामान होते. त्यामुळे सुरुवातीला मोठ्या प्रमाणात मोहर आला.
मात्र, नंतर तापमानातील चढ-उतार आणि दमट वातावरणामुळे वांजमोहर वाढला आणि अपेक्षित फलधारणा झाली नाही. याशिवाय थिप्स आणि तुडतुड्या किडींच्या प्रादुर्भावामुळे मोहर गळणे, फळांची वाढ खुंटणे आणि गुणवत्तेत घट झाली. परिणामी, आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याची माहिती हापूस आंब्याचे अडतदार युवराज काची यांनी दिली.
उत्पादन घटल्यामुळे बागायतदारांचे वार्षिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मजुरी, औषध फवारणी आणि देखभाल खर्च वाढला असतानाही अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने आर्थिक ताण वाढला आहे. कोकणातील अनेक भागांत फेबुवारी-मार्चमध्ये पडलेले हलके पावसाचे शिंतोडे आणि वातावरणातील आर्द्रता, यामुळे उरलेल्या फळांवरही परिणाम झाला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे.
मंदार कदम, शेतकरी, रत्नागिरी जिल्हा