

पुणे: रंगीबेरंगी वस्त्र, साखरगाठी, हार अशा विविध वस्तूंनी सजलेल्या लहान गुढी आपल्याला दुकानांत पाहायला मिळत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या, आयटी कंपन्यांकडून अशा गुढींची मागणी होत असून, आप्तेष्टांना भेट देण्यासाठी तयार गुढींची पुणेकरांकडून खरेदी होत आहे.
मोठ्या आकारातील तयार गुढीही बाजारात उपलब्ध आहेत. त्याचीही खरेदी होत आहे. याबरोबर पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांचा बॉक्स अन् गुढी उभारणीसाठी लागणारे विविध रंगांतील वस्त्र...अशा विविध प्रकाराच्या साहित्यांची गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. मंगळवारी (दि. 17) सणानिमित्त लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी रविवार पेठ, मंडई, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग येथे लगबग दिसून आली.
व्यावसायिक वीरेश चंदेल म्हणाले, पूजेसाठी आणि भेट देण्यासाठी लहान आकारातील तयार गुढींची खरेदी होत आहे. आम्ही या गुढी तयार करतो. गुढी पाडव्यानिमित्त या गुढींना चांगली मागणी आहे. यंदा गुढींच्या किमतीत वाढ झालेली नाही. खासकरून कॉर्पोरेट कंपन्या आणि आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी लहान गुढींची मागणी होत आहे.
तयार गुढीला पुणेकरांची पसंती
2 फुटापर्यंतच्या लहान गुढी पुणेकरांच्या पसंतीस उतरत आहेत. गुढींची किंमत 100 रुपयांच्या पुढे आहे. तर, मोठ्या आकारातील तयार गुढींचीही खरेदी होत आहे. तर गुढीसाठी लागणारे वस्त्र, अगरबत्तीपासून ते हळदी-कुंकू...असे पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या बॉक्सचीही खरेदी करण्यात येत आहे.