

शंकर कवडे
पुणे: सततच्या पावसामुळे आल्याची काढणी रखडल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आल्याची आवक घटली असून, वाढलेल्या मागणीमुळे दरात सुमारे दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. परराज्यांतील कैऱ्यांचा हंगाम संपल्याने आवक कमी होऊन त्यांच्या दरातही वाढ झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर फ्लॉवर, वांगी आणि ढोबळी मिरचीची मोठ्या प्रमाणात तोड झाल्याने रविवारी बाजारात आवक वाढल्याचे दिसून आले. त्यातुलनेत मागणी कमी पडल्याने त्यांच्या दहा टक्क्यांनी घसरण झाली असून, इतर बहुतांश फळभाज्यांची मागणी आणि पुरवठा संतुलित असल्याने त्यांचे दर टिकून आहेत.
रविवारी (दि. २) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात ९० ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची १० ते १२ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, हिमाचल प्रदेश व कर्नाटकातून घेवडा ३ टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग शेंग २ टेम्पो, इंदूर येथून गाजर ६ ते ७ टेम्पो, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ३ टेम्पो, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार १ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे ७ ते ८ टेम्पो, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा ४० ते ४५ टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार क्रेट्स, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ६ ते ७ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, मटार २ ते ३ टेम्पो, घेवडा आणि पावटा प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, कांदा सुमारे १०० टेम्पो इतकी आवक झाली.
पालेभाज्यांची स्वस्ताई
पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक लक्षणीय वाढली. रविवारी बाजारात कोथिंबिरीच्या तब्बल अडीच लाख जुड्या, तर मेथीच्या सव्वा लाख जुड्यांची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक ५० हजार, तर मेथीची ५५ हजार जुड्यांनी वाढली. वाढलेल्या पुरवठ्यामुळे कोथिंबीर, मेथी, शेपूसह बहुतांश पालेभाज्यांच्या घाऊक भावात घसरण झाली. पुढील काही दिवस पावसाची उघडीप कायम राहिल्यास पालेभाज्यांची आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सततच्या पावसामुळे बाजारातील आवक आणि मागणीचा समतोल प्रत्येक पिकानुसार बदलत आहे. ज्या पिकांची काढणी पावसामुळे विस्कळीत झाली, त्यांचे दर वाढत आहेत; तर हवामान सुधारल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होणाऱ्या मालावर दरांचा दबाव येत आहे. त्यामुळे ग्राहकांना काही भाज्या महाग मिळत असल्या, तरी बहुतांश भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. हवामानात स्थिरता राहिल्यास पुढील काही दिवसांत बाजारातील आवकही सुरळीत होऊन दरही स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
सिद्धार्थ कुंजीर, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन