Pune Garbage Management: पुण्याचे रस्ते चकाचक; मात्र वाढलेल्या कचऱ्याच्या वाहतुकीची नवी समस्या, २५० घंटागाड्या घेणार भाडेतत्त्वावर

झाडणकामासाठी मनुष्यबळ दुप्पट केल्याचा परिणाम; दररोज २०० टन अतिरिक्त कचरा संकलनामुळे रॅम्पवर वाढले ढीग
Garbage Management
Garbage ManagementPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने झाडणकामातील मनुष्यबळ जवळपास दुप्पट केल्याचा सकारात्मक परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवर स्वच्छतेची झळाळी दिसत असली, तरी झाडणकामातून गोळा होणारा वाढीव कचरा वाहून नेण्यासाठी वाहनांची कमतरता भासत असल्याने नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. रॅम्पवर कचऱ्याचे ढीग वाढू लागल्याने वाहतूकव्यवस्थेवर ताण आला असून, ही अडचण दूर करण्यासाठी २५० घंटागाड्या आणि अतिरिक्त बीआरसी वाहने भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली.

Garbage Management
Pune Land Compensation Case: शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी न्यायालयाचा दणका; पुणे महापालिका आयुक्त कार्यालय जप्तीच्या कारवाईतून बचावली

महापालिकेच्या हद्दवाढीनंतर शहरातील झाडणकामासाठी उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर १ ऑगस्टपासून कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट केली आहे. सुमारे नऊ हजार कर्मचारी शहरातील रस्ते आणि स्वच्छता विभागात कार्यरत झाले असून, त्यामुळे दररोज सुमारे २०० टन अतिरिक्त कचरा संकलित होत असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

Garbage Management
Pune Public Toilets: पुण्यात ५५ सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्याचा प्रस्ताव; दुरुस्तीऐवजी कोट्यवधींच्या पुनर्बांधणीवर प्रश्नचिन्ह

या नव्या व्यवस्थेत रस्ते स्वच्छ ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारांवर टाकली आहे. एखाद्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तीन महिन्यांसाठी सुरू केलेल्या या प्रायोगिक उपक्रमाला अवघे काही दिवस झाले असतानाच शहरातील रस्त्यांवर स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, वाढीव मनुष्यबळामुळे गोळा होणारा अतिरिक्त कचरा उचलण्यासाठी आवश्यक तेवढी वाहने उपलब्ध नसल्याने कचरा रॅम्पवरच साचू लागला आहे.

Garbage Management
Tenant Eviction Case: न्यायालयाच्या आदेशानंतरही जागेचा ताबा न दिल्याने भाडेकरू अडचणीत; उच्च न्यायालयाची अवमान नोटीस

त्यामुळे कचरा वाहतुकीत विलंब होत असून, ठेकेदारांकडूनही वाहनांच्या कमतरतेबाबत तक्रारी सुरू झाल्या आहेत. याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितले की, कचरा वाहतूक करणाऱ्या प्रत्येक घंटागाडीने दिवसाला साडेसहा फेऱ्या करणे अपेक्षित आहे. मात्र, उपलब्ध वाहनांची संख्या अपुरी असल्याने सध्या केवळ पाच फेऱ्याच होत आहेत. परिणामी, कचरा रॅम्पवर आणणे आणि तेथून प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत पोहचविण्यात विलंब होत आहे.

Garbage Management
Pune Student Safety: शिक्षणाच्या वाटेवर मुली असुरक्षित; छेडछाडीविरोधात समाजाने पुढे येण्याची गरज

आणखी २५० घंटागाड्या, ३० कॉम्पॅक्टर वाहनांची गरज

शहरातील वाढत्या कचऱ्याचा विचार करता आणखी २५० घंटागाड्या आणि ३० कॉम्पॅक्टर वाहनांची आवश्यकता आहे. ही वाहने भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासोबतच आणखी बीआरसी वाहने उपलब्ध करून देण्याचे नियोजनही सुरू आहे. पुढील पंधरा दिवसांत झाडणकाम आणि कचरा वाहतुकीची संपूर्ण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news