Pune Ganpati Visarjan police security 2025
पुणे: वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सव सोहळा विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिस सज्ज झाले असून, आठ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीतील संभाव्य गर्दीचे नियोजन, महिलांची सुरक्षा, चोरट्यांचा बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशभक्तांच्या मदतीसाठी मिरवणूक मार्गावर वैद्यकीय सेवेबरोबरच ठिकठिकाणी पोलिस मदत केंद्र उभारण्यात आली आहेत.
पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रण व्यवस्था बंदोबस्तासाठी उभी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मिरवणुकीच्या नियंत्रणासाठी पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), चेहरा ओळख प्रणाली (फेस रिकग्निशन), ड्रोन कॅमेरे, जीपीएस ट्रॅकर, सीसीटीव्ही, मोबाइल नियंत्रण कक्ष आणि अँटी-ड्रोन गन यांचा वापर केला जाणार आहे. चार स्तरांवर या बंदोबस्ताची आखणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. (Latest Pune News)
मिरवणूक मार्गावर 20 वॉच टॉवर, सीसीटीव्ही, ड्रोन आणि मोबाईल सर्व्हेलन्स युनिट्सच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. 93 अति संवेदनशील व 102 संवेदनशील मंडळे आणि 80 प्रमुख अतिगर्दीच्या ठिकाणी, चौकात पोलिसांची विशेष गस्त राहणार आहे. तर, दीडशेहून अधिक विसर्जन घाटांवर अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता 6 व 7 सप्टेंबर रोजी भव्य मिरवणुकीने होणार आहे.या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी व्यापक सुरक्षा आणि बंदोबस्ताची तयारी केली आहे. यात्रेचे स्वरुप धारण करणार्या सोहळ्यात पुणेकरांसह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात काटेकोर सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
शहरातील प्रमुख मध्यवर्ती घाटांसह एकूण दीडशेहून अधिक विसर्जन घाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात नदीवरील घाट, तलाव तसेच कृत्रिम हौदांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पोलिस व महापालिका अधिकार्यांची नियुक्ती करून विसर्जन सुरळीत होण्याची खबरदारी घेतली जाणार आहे.
3 हजार 959 गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन
शहरात यंदा 3 हजार 959 गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. यातील 93 अतिसंवेदनशील, 102 संवेदनशील मंडळे व 80 गर्दीची ठिकाणे पोलिसांनी निश्चित केली आहेत. या भागांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून सतत गस्त, पेट्रोलिंग व अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. विसर्जन मार्गावर मदत केंद्र स्थापन केले गेले आहेत.
प्रत्येक मदत केंद्रावर एक अधिकारी, महिला अंमलदार व स्वयंसेवक तैनात असतील. विसर्जन मार्गावरील मेट्रोच्या विस्तारीकरणाच्या पार्श्वभूमीवर कसबा पेठ व मंडई स्टेशनांवर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीच्या वेळी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
दृष्टिक्षेपात पोलिस बंदोबस्त
विसर्जन मिरवणुकीसाठी 8 हजारांहून अधिक पोलिसांचे मनुष्यबळ तैनात.
एसआरपीएफ, बीडीडीएस आणि शिघ्र कृतीदलाची पथके तैनात
शहरात 93 अतिसंवेदनशील, 102 संवेदनशील मंडळे व 80 अतिगर्दीची ठिकाणे, त्यावर विशेष लक्ष.
फरासखाना हद्दीत 20 वॉच टॉवर, विसर्जन मार्गावर मदत केंद्रे, प्रत्येक केंद्रावर अधिकारी व महिला अंमलदार नियुक्त.
शहरात 150 हून अधिक विसर्जन घाटांवर पोलिस व महापालिका अधिकार्यांची नियुक्ती.
सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाइल सर्व्हेलन्स युनिट्सद्वारे काटेकोर नजर.
जास्त वेळ थांबल्यास पोलिसांना जाणार अलर्ट
बेलबाग चौकातून मिरवणूक पुढे सरकताना मंडळ पुढे सरकते की जागेवरच थांबले आहे, याचे ट्रॅकिंग केले जाणार आहे. मंडळ जास्त काळ रस्त्यावर थांबलेले आढळल्यास पोलिस यंत्रणेकडून त्यांना सूचित करण्यात येणार आहे, याचे अलर्ट पोलिस अधिकार्यांच्या मोबाईलवर मिळत राहणार आहेत.
मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीपासून ते प्रत्येक मंडळाच्या गणेशाची मूर्ती सुरक्षितरित्या विसर्जन होईपर्यंत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर.