

पुणे: मागील वर्षी मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली आणि सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले. मिरवणूक संपायला तब्बल नऊ तास लागले...यंदा मात्र मानाच्या पाच गणपती मंडळांनी मिरवणूक तीन तास आधी संपविण्याचा निर्धार केला आहे.
सकाळी साडेनऊला महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात होणार असून, मानाच्या पाचव्या गणपतीचे विसर्जन सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत करण्याचे वेळापत्रकानुसार नियोजन आहे. (Latest Pune News)
त्यामुळे यंदा मिरवणूक सात तासांत संपण्याची शक्यता असून, मिरवणूक वेळेवर संपविण्याचा निर्धार मानाच्या पाच गणपती मंडळांनी केला आहे. याबाबतची माहिती मंडळांच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी दिली.
मानाच्या पाच मंडळांच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 5) केसरीवाडा येथे झालेल्या संवादामध्ये ही माहिती दिली. या वेळी श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, प्रशांत टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, केसरीवाडा गणेशोत्सवाचे अनिल सकपाळ आदी या वेळी उपस्थित होते. मिरवणूक सुरू झाल्यानंतर ढोल-ताशा पथकांचे स्थिर वादन आणि आवर्तनाचा वेळ कमी करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले.
मिरवणुकीला अतिरिक्त ताण कमी व्हावे, यासाठी प्रशासन आणि पोलिसांशी चर्चा केली. विसर्जन मिरवणूक वेळेवर संपवण्याबाबत आमची चर्चा झाली आणि यंदा पहिल्यांदाच मानाच्या पाच गणपती मंडळांनी मिरवणुकीचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले असून, त्यात दिलेल्या वेळा पाळल्या जाणार आहेत. तीन तास आधी मिरवणूक संपवण्यावर भर असेल, असेही श्रीकांत शेटे यांनी सागितले.
मिरवणूक रेंगाळण्यामागच्या कारणांचा केला अभ्यास
विसर्जन मिरवणूक रेंगाळण्यामागणी घटकांचा अभ्यास मंडळांच्या पदाधिकार्यांनी केला आहे. त्यानुसार मंडळासमोर असणार्या पथकांना कोणत्या चौकात किती वेळ वादन करायचे? स्थिर वादन कोठे करायचे, याच वेळापत्रक ठरले आहे. त्यामुळे यंदा मिरवणुकीत किमान तीन तास आधी विसर्जन मिरवणुका संपवण्याचा निर्धारही पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
यावर्षी तीन तास आधी विसर्जन मिरवणूक संपवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यासाठी मागील आठवडाभरापासून नियोजन सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीचा वेळ कमी करण्यासाठी पुढच्या वर्षी आणखी काही सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ.
- श्रीकांत शेटे, अध्यक्ष, श्री कसबा गणपती