Historical temples in Pune
पुणे: शिवाजीनगर गावठाण येथील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर हे भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात आणि जीवनात सुखसमृद्धी, मांगल्य नांदण्याची कामना करतात.
श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर हे मुठा नदीकिनारी वसलेले शिवकालीन मंदिर आहे. मूळ सोलापूर सिद्धेश्वराचे भक्त असणारे व्यापारी पुण्यात वास्तव्याला असताना नेहमी सोलापूरला जाणे शक्य नसल्याने त्यांनी श्री सिद्धेश्वर मंदिराची स्थापना करण्याचे योजिले. (Latest Pune News)
बांधकाम सुरू असताना त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यानुसार उत्खनन केल्यानंतर स्वयंभू वृद्धेश्वर शिवलिंग सापडल्याने दोन्हीही वृद्धेश्वर आणि सिद्धेश्वर अशी मंदिरांची स्थापना करण्यात आली होती. पुढे कालांतराने सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात सरदार घोरपडे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
तेव्हाचे गावठाण परिसरातील अनेक मल्ल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटपायर्या चढून उतरून महादेवाला नदीच्या पाण्याने अभिषेक करीत असत, तो त्यांचा नित्य व्यायामाचाच भाग होता. परंतु, पानशेत धरणफुटीत मंदिर परिसराचे खूप नुकसान झाले. तसेच, त्यापुढेही अनेक वर्षे मंदिर दुर्लक्षितच राहिले.
दहा वर्षांपूर्वी मंदिर व्यवस्थापनाने दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि आता त्यातील बहुतांश काम पूर्ण झालेले आहे, अशी माहिती श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट यांनी सांगितली.
मंदिरात महाशिवरात्री सप्ताह, श्री रामनवमी, श्री हनुमान जन्मोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव, तुळशीविवाह, कोजागरी पौर्णिमा महिला भोंडला आणि दांडिया असे कार्यक्रम आयोजित केले जातात, असेही बहिरट यांनी सांगितले.