Pune Ganeshotsav Crowd: पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; मध्यवर्ती पेठांत पायी दर्शन, उपनगरांत दुचाकींवरून भटकंती

जिवंत, हलते आणि ऐतिहासिक देखावे ठरताहेत आकर्षण; गौरी विसर्जनानंतर आज रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी
Ganeshotsav Crowd
Ganeshotsav CrowdPudhari
Published on
Updated on

पुणे: कुठे देखावा पाहण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा... कुठे गर्दीतून वाट काढत एका मंडळाकडून दुसऱ्या मंडळाकडे पायी निघालेले गणेशभक्त... तर कुठे दुचाकीवरून सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी सुरू असलेली भटकंती... त्यातच गणरायाचे मोहक रूप आणि भव्य देखावे मोबाईलमध्ये टिपण्यासाठी उंचावलेले हात अन् रील्स करण्यात रमलेली तरुणाई... अशा उत्साही वातावरणाने मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्ये गणेशोत्सवाचा आनंद दिवसेंदिवस द्विगुणित होत आहे. तर, सायंकाळ होताच शहरातील गणेशोत्सवाचे वातावरण बदलत आहे. मध्यवर्ती भागातील बहुतांश मंडळांच्या ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, राजवाडे आणि महालांच्या प्रतिकृती दिवसभर सुरू असल्याने या ठिकाणी दिवसभर भाविकांची गर्दी होत आहे. तर, अन्य ठिकाणी सायंकाळ होताच हलते देखावे आणि विद्युतरोषणाईचे देखावे सुरू होत आहेत.

Ganeshotsav Crowd
Ujani Dam Fishing: महिलांनी टेबलावर बांगड्या फोडल्यावर 'एमडी' आले जागेवर; मासेमारी ठेक्याला अखेर स्थगिती

मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळांच्या दर्शनासाठी मध्यवर्ती भागात गर्दीचा ओघ वाढत आहे. लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्त्यावर रात्री उत्सवाचा वेगळाच रंग पाहायला मिळत आहे. मध्यवर्ती भागातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध असल्याने येथे पायी फिरणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी आहे. एका मंडळाचे दर्शन घेतल्यानंतर गर्दीतून वाट काढत दुसऱ्या मंडळाकडे जाणारे कुटुंबीय, मित्रांचे समूह आणि लहान मुलांसह फिरणारे पालक, असे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. मध्यवर्ती भागापासून दूरच्या पेठा आणि उपनगरांमध्ये मात्र दुचाकींवरून एका मंडळातून दुसऱ्या मंडळाकडे जाणाऱ्यांची वर्दळ आहे.

Ganeshotsav Crowd
Someshwar Sugar Factory Election: अजितदादांनंतर ‘सोमेश्वर’च्या मैदानात इच्छुकांची गर्दी; भाजप, राष्ट्रवादीसह पाच पक्षांची तयारी

ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, राजवाडे आणि महालांच्या प्रतिकृतींसह जिवंत, हलते तसेच समाजप्रबोधनपर देखावे गर्दी खेचत आहेत. काही ठिकाणी देखावा पाहण्यासाठी भाविक शिस्तीत रांगा लावत आहेत, तर गर्दी वाढलेल्या मंडळांसमोर पुढे जाण्यासाठी झुंबडही उडत आहे. जिवंत आणि हलत्या देखाव्यांसमोर मात्र चिमुकल्यांचे डोळे खिळून राहत आहेत. वडिलांच्या खांद्यावर बसून देखावा न्याहाळणारी मुले, फुगे आणि खेळण्यांकडे बोट दाखवत हट्ट करणारा बालचमू उत्सवाच्या वातावरणात आणखी रंग भरत आहे. देखावा सुरू होताच गर्दीत एकाचवेळी असंख्य मोबाईल उंचावत आहेत. कुणी गणरायाचे रूप कॅमेऱ्यात साठवत आहे, कुणी रोषणाईचा व्हिडीओ करीत आहे, तर कुणी सेल्फी आणि रील्समध्ये मग्न आहे. एकीकडे 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष, दुसरीकडे भक्तिगीतांचे सूर आणि त्यात रोषणाईने उजळलेले रस्ते... या साऱ्यामुळे मध्यवर्ती पुण्यापासून उपनगरांपर्यंत रात्री उशिरापर्यंत गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

Ganeshotsav Crowd
Shirur Crime: शिरूरमध्ये जुन्या भांडणातून ३३ वर्षीय युवकाचा गोळी झाडून खून; तिघांविरुद्ध गुन्हा

रील्समधून घराघरांत देखावे

यंदा मंडळांचे देखावे प्रत्यक्ष रस्त्यांबरोबरच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात झळकत आहेत. गणरायाच्या मूर्ती, विद्युतरोषणाई, जिवंत-हलते देखावे यांचे व्हिडीओ आणि रील्स सातत्याने शेअर होत आहेत. त्यामुळे एखादा देखावा मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिल्यानंतर त्याच मंडळाच्या ठिकाणी भाविकांची गर्दीही दिसून येत आहे. प्रत्यक्ष देखावा पाहताना पुन्हा मोबाईल काढून त्याचा व्हिडीओ किंवा रील तयार करणारी तरुणाई ठिकठिकाणी नजरेस पडत आहे.

Ganeshotsav Crowd
Sinhagad Road Traffic: सिंहगड रोडवरील कोंडी फुटणार? हिंगणे ते सहकारनगर डोंगरातून बोगद्याचा प्रस्ताव

गौरी विसर्जनानंतर आज रंगणार देखाव्यांची रात्र

गौरी विसर्जनानंतर आज (शनिवारी) शहरातील गणेशोत्सवाच्या देखाव्यांना मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. रविवारी सुट्टी असल्याने गौराईला निरोप दिल्यानंतर पुणेकर सहकुटुंब गणेशदर्शनासह देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतील. त्यातच आज मध्यरात्री बारापर्यंत देखावे सुरू राहणार असल्याने मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत भाविकांचा ओघ राहण्याची शक्यता आहे. आकर्षक विद्युतरोषणाई, जिवंत व हलते देखावे तसेच ऐतिहासिक, धार्मिक आणि समाजप्रबोधनपर देखावे भाविकांचे आकर्षण ठरणार आहेत. त्यामुळे दिवसभर गौरी विसर्जनाची लगबग आणि सायंकाळनंतर देखाव्यांची गर्दी, असे चित्र शहरात पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news