

पुणे: पुण्यातील वैभवी गणेशोत्सवाची शुक्रवारी (दि. २५) सांगता होत असून, लाडक्या गणरायाला भाविकांकडून भक्तिभावाने निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरात चोख नियोजन केले आहे. घाटांची स्वच्छता, कृत्रिम विसर्जन व्यवस्था, मूर्तिदान आणि निर्माल्य संकलन यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत नियोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नदी किंवा तलावात विसर्जन न करता महापालिकेच्या सुविधांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण ३८ विसर्जन घाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी ५८ बांधलेले हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शहरातील विविध ३०५ ठिकाणी ८१२ लोखंडी टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नागरिकांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. गणेशमूर्तींचे दान करण्यासाठी २२४ मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली, तर शाडूमातीच्या गणेशमूर्ती तसेच शाडूमाती संकलनासाठी ४५ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवकाळात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारे निर्माल्य संकलनासाठी २६७ ठिकाणी ३५८ निर्माल्य कलश व कंटेनर ठेवले आहेत. विसर्जन घाटांवर निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जनानंतर हौद व लोखंडी टाक्यांमध्ये जमा होणाऱ्या गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन करण्यासाठी वाघोली येथील खाणीची व्यवस्था केली आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत जमा होणाऱ्या मूर्तींचे या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने पुनर्विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनाच्या नियोजनासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात केले आहे. यामध्ये १६ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, १६१ आरोग्य निरीक्षक, २९२ मुकादम आणि ४१७९ कायम सफाई सेवक यांचा समावेश आहे. तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार एकूण १६७० वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील सार्वजनिक, सुलभ आणि सशुल्क स्वच्छतागृहे १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संबंधित केअरटेकरला नागरिकांकडून शुल्क न आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, १४ ते २५ सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सार्वजनिक, सुलभ आणि सशुल्क स्वच्छतागृहे नागरिक व पर्यटकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. संबंधित केअरटेकरने वापरकर्त्यांकडून शुल्क आकारू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी जवळच्या हौद, टाकी किंवा मूर्तिदान केंद्राचा वापर करावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
अशी राहणार व्यवस्था
३८ विसर्जन घाट
५८ बांधलेले विसर्जन हौद
३०५ ठिकाणी विसर्जनाची सुविधा
८१२ लोखंडी टाक्या
२२४ मूर्तीसंकलन केंद्रे
४५ शाडूमाती संकलन केंद्रे
२६७ ठिकाणी निर्माल्य संकलन
३५८ निर्माल्य कलश/कंटेनर
४१७९ कायम सफाई सेवक
१६७० वाहने उपलब्ध
विसर्जनानंतर मूर्तींचे वाघोलीत पुनर्विसर्जन
महापालिकेच्या हौद आणि लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जित केलेल्या गणेशमूर्तींचे पुढे पुनर्विसर्जन केले जाणार आहे. यासाठी वाघोली येथील खाणीची व्यवस्था करण्यात आली असून, १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत जमा होणाऱ्या मूर्तींचे तेथे नियोजनबद्ध पद्धतीने पुनर्विसर्जन केले जाणार आहे. गणेशोत्सवाच्या कामांसाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार १,६७० वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.--