

पुणे: विसर्जन सोहळ्यात 'आव्वाजा'ची मर्यादा ओलांडणाऱ्या ढोल-ताशा पथकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. डेसिबल यंत्राद्वारे विसर्जन मार्गावर आवाजाचे मापन केले जाणार आहे. विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या मंडळांना फक्त दोन ढोल-ताशा पथकांचा समावेश करता येणार आहे. प्रमुख चौकांत दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ स्थिर वादन करता येणार नाही, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या ६३८ गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. ढोल-ताशा पथकांच्या प्रमुखांशी संवाद साधण्यात आला असून, ढोल-ताशा पथकांनी आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.
ध्वनिप्रदूषणावर लक्ष
'दहीहंडी, गणेशोत्सवापूर्वी पोलिसांनी सातत्याने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधला. ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर नियंत्रित स्वरूपात करावा. ध्वनिक्षेपक यंत्रणेत धडकी भरवणारे 'प्रेशर मिड', 'प्लाझ्मा साऊंड' या उपकरणांचा वापर करू नये. ध्वनिक्षेपक यंत्रणेत चार बास आणि चार टाॅपचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेची तपासणी जागेवर जाऊन करण्यात येणार आहे. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ध्वनिक्षेपक यंत्रणा जागेवर जप्त करण्यात येईल, तसेच गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत', असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
१२० ठिकाणी ध्वनीपातळीचे मोजमाप
विसर्जन मिरवणूक मार्गावर १२० ठिकाणी ध्वनीपातळीचे मोजमाप डेसिबल मोजणी यंत्राद्वारे केले जाणार आहे. ढोल-ताशा पथकातील 'टोल'वर बंदी घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत दखल घेतली असून, काटेकारेपणे आदेशाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.