

पुणे: गणरायाला निरोप देण्यासाठी पुणे सज्ज झाले असून, अनंत चतुर्दशीला शुक्रवारी (दि. २५) होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी महापालिकेने सुरक्षा, आपत्कालीन मदत आणि स्वच्छतेची व्यापक तयारी केली आहे.
शहरातील प्रमुख १५ विसर्जन घाटांवर चोवीस तास बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, १२० जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान तैनात करण्यात आले आहेत. विसर्जनाच्या २७७ ठिकाणी तब्बल ४ हजार १३० फ्लड लाइट, तर ९४ ठिकाणी ३९० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
मिरवणुकीदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी महापालिकेचा नियंत्रण कक्षही चोवीस तास कार्यरत राहणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृहांची व्यवस्था, अतिरिक्त प्रकाशयोजना, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
नदीकाठच्या विसर्जन घाटांवर दुरुस्ती व रंगरंगोटीची कामे करण्यात आली असून, निर्माल्य कलश, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अग्निशमन दलाकडून १५ घाटांवर २२ अधिकारी, १५ जवान आणि १२० जीवरक्षकांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापैकी ९० जीवरक्षक घाटांवर, तर ३० जीवरक्षक मध्यवर्ती अग्निशमन केंद्रात राखीव ठेवण्यात येणार आहेत.
आपत्कालीन परिस्थितीसाठी २८ लाइफ जॅकेट, १४ रिंग आणि १४ दोरखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नदीपात्रात नागरिक वाहून जाण्याच्या घटना टाळण्यासाठी घाटांवर आडवे दोरखंड बांधण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत.
अलका टॉकीज चौकात अग्निशमन वाहनासह तीन जवान तैनात असतील. अलका टॉकीज, स. प. महाविद्यालय आणि शनिपार चौकात टेहळणी मनोरे उभारले आहेत. विसर्जन घाटांवर पर्यायी वीज पुरवठ्यासाठी जनित्रांची व्यवस्था केली असून, तांत्रिक बिघाड झाल्यास तो तातडीने दूर करण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निर्माल्य संकलन, कीटकनाशक फवारणी, फिरती स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्तींचे विसर्जन टाळून नागरिकांनी कृत्रिम हौदांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
विसर्जनासाठी अशी आहे व्यवस्था
- १५ प्रमुख घाटांवर चोवीस तास बंदोबस्त
-१२० जीवरक्षक, २२ अग्निशमन अधिकारी आणि १५ जवान
-२७७ ठिकाणी ४,१३० फ्लड लाइट
- ९४ ठिकाणी ३९० सीसीटीव्ही कॅमेरे
- २८ लाइफ जॅकेट, १४ रिंग आणि १४ दोरखंड
-क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर स्वतंत्र आपत्कालीन पथके
मध्यवर्ती भागात १५० फिरती स्वच्छतागृहे
मानाच्या पाचही गणपतींचा समावेश असलेल्या विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या भागात ३२ ठिकाणी ६० लोखंडी टाक्या आणि २२ ठिकाणी १५० फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध केली आहेत.
सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये १,१०७ आसने आणि २९३ मुताऱ्यांची सुविधा आहे. स्वच्छतेच्या देखरेखीसाठी १०० कर्मचारी व पर्यवेक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी बेलबाग आणि अलका टॉकीज चौकात हिरकणी कक्ष उभारण्याचे नियोजन आहे.
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क क्रमांक - विभाग दूरध्वनी क्रमांक
महापालिका नियंत्रण कक्ष - ०२०-२५५०१२६९ - २५५०६८००
अग्निशमन दल - १०१ - ०२०-२६४५१७०७
पोलिस नियंत्रण कक्ष - १००- ११२
रुग्णवाहिका - १०८
गतवर्षी साडेसहा लाख मूर्तींचे विसर्जन
गेल्या वर्षी गणेशोत्सवात पुणे शहरात एकूण ६ लाख ५४ हजार ४१० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यापैकी १ लाख १३ हजार १३६ मूर्तींचे बांधलेल्या हौदांत, तर ३ लाख ६२ हजार ३१९ मूर्तींचे लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जन करण्यात आले होते. संकलन केंद्रांवर १ लाख ७८ हजार ९५५ मूर्ती जमा झाल्या होत्या. या कालावधीत ९२३ टनांहून अधिक निर्माल्य संकलित करण्यात आले होते.
प्रमुख विसर्जन घाट
१. अमृतेश्वर घाट २. पुलाची वाडी ३. नटराज सिनेमा जवळ ४. ओंकारेश्वर ५. वृद्धेश्वर ६. गरवारे कॉलेज, ७. पांचाळेश्वर ८. अष्टभुजा मंदिर ९. संगम घाट १०. विठ्ठल मंदिर ११. बाप्पू घाट १२. ठोसर पागा घाट ,१३. चिमा उद्यान येरवडा १४. दत्तवाडी घाट १५. वारजे