Ganesh Idol Decoration: पुण्यात यंदा गणरायाचा राजेशाही थाट; हिरे-मोती, कुंदनाच्या दागिन्यांनी बाप्पाचे रूप खुलले

पुण्यात यंदा गणरायाच्या मूर्तींना राजेशाही थाटाचा साज दिला जात आहे. हिरे-मोती, कुंदन, रंगीबेरंगी खडे, पैठणी-इरकलीचा पीतांबर आणि जरीकाठाच्या शेल्याने बाप्पाचे रूप खुलले आहे.
Ganesh Idol Decoration
Ganesh Idol DecorationPudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: मुकुटावर लखलखणारे हिरे-मोती... गळ्यात कुंदन आणि रंगीबेरंगी खड्यांनी सजलेला कंठीहार... दंडावर नक्षीदार बाजूबंद... अंगावर पैठणी-इरकलीचा भरजरी पीतांबर, खांद्यावर जरीकाठाचा शेला अन् डोक्यावर रुबाबदार फेटा... अशा राजेशाही थाटातील गणरायाचे मनोहारी रूप यंदा पुणेकरांना भुरळ घालत आहे. रंगसंगती आणि मूर्तीच्या सुबकतेबरोबरच दागिने आणि वस्त्रालंकारांच्या सजावटीवर विशेष भर दिल्याने बाप्पाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

लाडक्या गणरायाचे रूप इतरांपेक्षा वेगळे आणि उठावदार असावे, याकडे गणेशभक्तांचा कल वाढला आहे. त्यामुळे मूर्तिकार आणि सजावट कलाकारांकडूनही बाप्पाच्या आभूषणांमध्ये नवनवीन प्रयोग केले जात आहेत.

मुकुट, सोंडपट्टा, बाजूबंद, कंठीहार यांसह विविध अलंकारांवर हिरे, मोती, कुंदन आणि रंगीबेरंगी खड्यांची मुक्तहस्ते पखरण केली जात आहे. त्यामुळे मूर्तीवर पडणाऱ्या प्रकाशासोबत चमकणारे हे अलंकार बाप्पाच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.

Ganesh Idol Decoration
Pune Fake Doctor: शहरातील दोन बोगस डॉक्‍टरांवर गुन्‍हे दाखल; पदवी-नोंदणीविना ‘गुरुकृपा क्लिनिक’

खड्यांच्या झगमगाटात खुलले रूप

लेस, कुंदन, मोती, स्टोन चेन, बॉल चेन, रेडिमेड ब्रोच, भिकबाळी, विविध शस्त्रे तसेच कापड आणि प्लास्टिकच्या आकर्षक फुलांचा वापर मूर्तींच्या सजावटीसाठी केला जात आहे. मुकुटापासून पायातील अलंकारांपर्यंत रंगसंगती साधून सजावट करण्यावर कलाकारांचा भर आहे.

लखलखणारे खडे, मोत्यांच्या नाजूक कलाकुसरीमुळे मूर्तीला वेगळीच झळाळी मिळत आहे. त्यामुळे साध्या मूर्तींच्या तुलनेत या मूर्तींची किंमत २० ते ३० टक्क्यांनी अधिक असल्याचे धायरी विघ्नहर्ता आर्टस्‌चे राकेश चांदेकर यांनी सांगितले.

पैठणी-इरकलीत बाप्पाचा राजेशाही थाट

एरवी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या गणेशमूर्तींना प्रत्यक्ष वस्त्र नेसविण्याची परंपरा प्रामुख्याने पाहायला मिळते. मात्र, आता हा ट्रेंड पुण्यातील घरगुती गणपतींपर्यंत पोहोचला आहे. पैठणी आणि इरकलीच्या कापडातून साकारलेले पीतांबर, भरजरी शेला आणि त्याला साजेसा फेटा अशा पेहरावातील गणेशमूर्ती बाजारात लक्ष वेधून घेत आहेत.

विशेष म्हणजे, वस्त्र नेसविल्यानंतर मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे, या दृष्टीनेच काही मूर्तींची घडण केली जात आहे. विविध रंगांच्या कापडाला जरीची किनार, नक्षीकाम आणि त्याला साजेसे अलंकार जोडले जात आहेत.

Ganesh Idol Decoration
AI Photo Misuse: ‘ऐंशीच्या दशकातील छायाचित्रां’च्या मोहापासून सावध राहा; माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचे आवाहन

पारंपरिक पेहरावाला आधुनिक सजावटीची जोड मिळाल्याने या मूर्तींचे रूप अधिक सुबक आणि उठावदार झाले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘वस्त्रालंकारातील बाप्पा’हा नवा ट्रेंड पुणेकरांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

मुकुटापासून पीतांबरापर्यंत ‘फॅशन’चा साज

दागिन्यांसाठी : कुंदन, मोती, रंगीबीरंगी खडे, स्टोन चेन, बॉल चेन, लेस, ब्रोच, भिकबाळी

वस्त्रांसाठी : पैठणी, इरकली, जरीकाठाचे पीतांबर, शेला आणि फेटा

सजावटीसाठी : कापडी फुले, प्लास्टिकची फुले, शस्त्रे आणि विविध अलंकार

किंमत : साध्या मूर्तींच्या तुलनेत सजविलेल्या मूर्ती सुमारे २० ते ३० टक्क्यांनी महाग

घरगुती गणपतींपासून सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींपर्यंत खडे जडविण्याचे काम केले जाते. दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी गणपती तसेच अखिल मंडईच्या गणेशमूर्तीवर कलाकुसर करताना कलाकाराचा खरा कस लागतो. आपला बाप्पा इतरांपेक्षा वेगळा व आकर्षक असावा, अशी प्रत्येक गणेशभक्ताची भावना असते. त्याच पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या आकर्षक मूर्ती घडवल्या आहेत. यंदा किमतीत वाढ झाली तरी त्याचा ग्राहकांच्या मागणीवर फारसा परिणाम झाला नाही.

- आमिष भोज, डायमंड वर्क आर्टिस्ट, धानोरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news