

पुणे: सामाजिक माध्यमांवर सध्या ऐंशीच्या दशकातील छायाचित्रांसारखे रूप देण्याचा नवा प्रवाह लोकप्रिय होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने छायाचित्रांमध्ये बदल करण्यासाठी विविध मोबाईल ॲप वापरले जात आहेत.
मात्र, आकर्षक छायाचित्रांच्या मोहापायी आपली छायाचित्रे अनोळखी मोबाईल ॲपवर पाठवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ऐंशीच्या दशकातील छायाचित्रां’च्या मोहापासून सावध रहावे असे आवाहन माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले आहे.
डॉ. शिकारपूर म्हणाले, “कोणतेही मोबाईल ॲप वापरण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासा. ते कोणती माहिती मागते आणि त्या माहितीचा वापर कशासाठी करते, हे समजून घ्या. अनावश्यक परवानग्या देऊ नका. ओळखपत्र, बँक खात्याची माहिती, संकेतशब्द किंवा खासगी छायाचित्रे अनोळखी ॲपवर देणे टाळा.”
छायाचित्रांचा गैरवापर करून बनावट ओळख, खोटी छायाचित्रे, आर्थिक फसवणूक, बदनामी किंवा मानसिक त्रास निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळे कोणतेही छायाचित्र मोबाईल ॲपवर पाठवण्यापूर्वी त्याच्या सुरक्षिततेची खात्री करणे आवश्यक आहे. क्षणिक आकर्षणापेक्षा आपली डिजिटल ओळख आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.