

सुवर्णा चव्हाण
पुणे: पुणे हे चित्रपट ते वेबसीरिजच्या चित्रीकरणासाठीचे निर्माते-दिग्दर्शकांसाठी आवडते ठिकाण ठरत असून, पुण्यामध्ये गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये चित्रीकरणाचे प्रमाण वाढले आहे. खासकरून वेबसीरिज, म्युझिक अल्बम्स, व्हिडीओ पॉडकास्टच्या चित्रीकरणांचे प्रमाण मोठे असून, त्यामुळे पुण्यात चित्रीकरणासाठीच्या नव्या स्टुडिओंची संख्याही वाढली आहे.
पुण्यामध्ये कोरेगाव पार्क, कोथरूड, डेक्कन परिसर, कॅम्प, बावधन, बाणेर, प्रभात रस्ता आदी ठिकाणी चित्रीकरणासाठीचे स्टुडिओ उघडण्यात आले आहेत. पुण्यातील विविध लोकेशन्सवर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण होत असून, पुण्याच्या आसपासच्या चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण होत आहे. महिन्याला किमान 25 ते 30 चित्रीकरण पुण्यात होत आहेत. चित्रीकरणाचा खर्च कमी आणि चांगले लोकेशन्स यामुळे निर्माते-दिग्दर्शक पुण्यात चित्रीकरण करण्याला प्राधान्य देत आहेत. पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पण, असे असले तरी सांस्कृतिक कार्यक्रम अन् नाट्यप्रयोगांच्या तुलनेत पुण्यामध्ये चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण फारसे होत नव्हते. पण आता हे चित्र बदलले असून, पुण्यातही चित्रीकरणाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
चित्रीकरणासाठीचे चांगले लोकेशन्स, कमी खर्च, चित्रीकरणासाठी मिळणारी परवानगी अशा विविध कारणांमुळे पुण्यात चित्रीकरण करण्याला निर्माते-दिग्दर्शक भर देत आहेत. त्यामुळेच चित्रीकरणासाठीचे अनेक नवे स्टुडिओ पुण्यात उघडले गेले असून, येथे जाहिराती, व्हिडीओ पॉडकास्ट, सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, म्युझिक अल्बम्सचे चित्रीकरण होत आहे. आता चित्रीकरणासाठी स्टुडिओ भाडेतत्वावर दिले जात आहेत. फक्त मराठीच नव्हे तर इंग््राजी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांचे चित्रीकरणही पुण्यात होत असल्याचे पाहायला मिळेल. चित्रीकरणासाठी साजेसे ठिकाण येथे असल्याने वेबसीरीजपासून ते म्युझिक अल्बम्सच्या चित्रीकरणासाठी पुणे हे महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.
चित्रीकरणासाठी प्रतिदिन 50 हजार ते लाखाचा खर्च
जुने वाडे, निसर्गरम्य ठिकाणे, कॉर्पोरेट कार्यालये आदी लोकेशन्सवर चित्रीकरण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. कॅम्प परिसर, भोर, कात्रज, चांदणी चौक, मुळशी, पानशेत, खडकवासला येथे चित्रीकरणाचे प्रमाण वाढले आहे. ग््राामीण भागात चित्रीकरणाचे प्रमाण अधिक आहे. चित्रीकरणाचा एका दिवसाचा खर्च अंदाजे 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत होतो.
निर्माते-दिग्दर्शकांसह अनेक कलाकार इनडोअर चित्रीकरणासाठी विचारणा करीत आहेत. खासकरून गायन-वादन, म्युझिक अल्बम्स, जाहिराती, वेब सीरिज, व्हिडाओ पॉडकास्ट, लघुपट आदींचे चित्रीकरण आमच्याकडे होत आहे. पुण्यात चित्रीकरण करण्याला अनेकांची पसंती असून, त्यामुळेच स्टुडिओत चित्रीकरण करण्याला चांगला प्रतिसाद आहे.
विवेक गाटे, स्टुडिओ संचालक
गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात चित्रीकरणाचे प्रमाण वाढले आहे. महिन्याला किमान 15 ते 20 चित्रीकरण होत असून, पुणे हे दिग्दर्शक-निर्माते आणि कलाकारांच्या दृष्टीने चित्रीकरणासाठीचे पसंतीचे ठिकाण बनले आहे.
मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ