

सुनील जगताप
पुणे: रणरणत्या उन्हाच्या झळांनी आसमंत होरपळू लागला की, सह्याद्रीच्या कुशीतील वनराईला वणव्याचे ग्रहण लागण्याची भीती निर्माण होते. मात्र, निसर्गाचा हा अनमोल ठेवा अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडू नये, यासाठी पुणे वनविभागाने कंबर कसली आहे.
हिरवा शालू नेसलेल्या वनराजीचे रक्षण करण्यासाठी पुणे वनविभागांतर्गत तब्बल 132 किलोमीटरची जाळरेषा आखण्यात आली असून, वणव्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
पुणे वनविभागाच्या अखत्यारीत एकूण 15,64,300 हेक्टरचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र असून, त्यातील 11.07 टक्के क्षेत्र वनराजीने व्यापलेले आहे. या वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी पुणे वन विभागांतर्गत 12 वनपरिक्षेत्र कार्यालये अहोरात्र कार्यरत आहेत.
2025-26 या वर्षात वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विभागाने विशेष कृती आराखडा राबवला आहे. यामध्ये सासवड, पौड, शिरोता आणि पुणे यांसारख्या संवेदनशील भागांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 1466.65 हेक्टर क्षेत्रात जाळरेषेची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामासाठी विभागाने 114 हंगामी मजुरांची नियुक्ती केली आहे, जे जंगलात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘प्रथम प्रतिसादक’ म्हणून काम करतील. सासवड वनपरिक्षेत्रात सर्वाधिक 21.42 कि.मी., तर पौडमध्ये 17.58 किमीची जाळरेषा तयार करून वणव्याची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला आहे.
वनक्षेत्रातील कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची किंवा आगीची माहिती टोल-फ्री क्रमांक 1926 वर देण्याचे आवाहन उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग यांच्यामार्फत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
गुन्हा केल्यास तुरुंगवास; वन विभागाचा इशारा
केवळ तांत्रिक उपाययोजना करून न थांबता, वनविभागाने जनजगृतीवरही भर दिला आहे. वनात मुद्दाम आग लावणे हा ‘भारतीय वन अधिनियम 1927’ च्या कलम 26 (1) नुसार गंभीर दंडनीय गुन्हा आहे. अशा कृत्यामुळे निसर्गाची हानी झाल्यास दोषींना 5 हजार रुपये दंड आणि 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी वनसंपदेला आग लागण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा काही ठिकाणी ही आग लावल्याचे प्रकार यापूर्वी झाल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी कायदा कडक केला असून, वणवा लागल्यास ड्रोनच्या साहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच हंगामी मजुरांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
- विशाल चव्हाण, सहाय्यक उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग