

पुणे: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला. दरम्यान, पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.
मे 2018 रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी पीडितेच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेच्या दिवशी पीडिता घरात एकटी असताना आरोपीने घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली.
घाबरलेल्या मुलीला विश्वासात घेऊन आईने विचारणा केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपीला अटक करीत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील लीना पाठक यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे आणि पीडितेची साक्ष ग््रााह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. आरोपी गेल्या 7 वर्षे, 11 महिने आणि 20 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होता.