

पिंपरी : संतोष शिंदे : समाज व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड संपवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वर्षभर छापेमारी सुरू असते.
चालू वर्षात लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचारप्रकरणी राज्यभरात तब्बल 726 गुन्हे दाखल केले आहेत. यातील सर्वाधिक म्हणजेच 65 गुन्हे हे पुणे जिल्ह्यात दाखल आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे जिल्हा हा भ्रष्टाचारात अव्वल ठरल्याचे बोलले जात आहे.
शासनाच्या प्रत्येक विभागाचा कारभार पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अतोनात प्रयत्न करीत आहे. या विभागाकडून शासनाच्या 44 वेगवेगळ्या विभागांवर लक्ष ठेवले जाते.
चालू वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस दलासह अन्य ठिकाणी असे एकूण 726 गुन्हे दाखल करून एक हजार 45 जणांना आरोपी केले.
यातील विशेष बाब म्हणजे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 65 ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्यात आली. त्यामुळे 14 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भ्रष्ट कारभारामध्ये पुणे जिल्हा एक नंबर ठरला आहे.
तर, औरंगाबादचा दुसरा आणि नाशिक जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे 52 गुन्हे दाखल आहेत. तर, नाशिकमध्ये 39 गुन्हे दाखल आहेत.
चलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणार्या तक्रारींनुसार महसूल आणि पोलिस दल हे सर्वाधिक भ्रष्ट आहेत. चालू वर्षात राज्यभरात महसूल विभागाशी संबंधित 171 आणि पोलिस खात्याशी निगडित 166 गुन्हे दाखल आहेत.
महसूल विभागातील प्रकरणामध्ये 244 जणांना तर, पोलिस दलातील 246 जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 42 विभागांमध्ये पंचायत समितीची सर्वाधिक 54 प्रकरणे आहेत.
त्यामुळे शासनाच्या 44 विभागांमध्ये महसूल आणि पोलिस दल सर्वाधिक भ्रष्ट असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड असे आठ परिक्षेत्रानुसार काम चालते.
यातील पुणे परिक्षेत्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर अशी पाच जिल्हे येतात. सन 2019 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 866 ठिकाणी सापळा रचून कारवाई केली होती.
त्या वेळीदेखील पुणे जिल्ह्याचा समावेश असलेल्या पुणे परिक्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 184 ठिकाणी कारवाईची नोंद आहे. तर, औरंगाबाद (124) आणि नाशिक (123) परिक्षेत्र अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानावर होते.
सन 2020 मध्येदेखील पुणे परिक्षेत्रात सार्वधिक 139 प्रकरणांची नोंद आहे. तर, नाशिक (100) आणि औरंगाबाद (93) अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानावर आहे.
यंदाच्या राज्यातील 726 पैकी 160 गुन्हे पुणे परिक्षेत्रातील आहेत. त्यामुळे सलग तिसर्या वर्षीही पुणे परिक्षेत्रातील भ्रष्टाचारात 'नंबर वन' ठरल्याचे दिसून येत आहे.
"पुण्यात लाचखोरी जास्त आहे, असे म्हणण्यापेक्षा पुणेकरांचे लाचलुचपत विभागाकडे तक्रार देण्याचे प्रमाण अन्य भागांच्या तुलनेत जास्त आहे, असे म्हणणे योग ठरेल. तक्रारी जास्त येत असल्याने पुणे विभागात सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत.
पुणे प्रमाणेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येदेखील नागरिकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आवाहन केले जाते. मात्र, म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. "
– राजेश बनसोडे, पोलिस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे