अनिल परब हेच शिवसेनेचे गद्दार ; रामदास कदम यांचा गंभीर आरोप | पुढारी

अनिल परब हेच शिवसेनेचे गद्दार ; रामदास कदम यांचा गंभीर आरोप

मुंबई, पुढारी ऑनलाईन : ‘शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशात घालणारा अनिल परब आहेत. तेच खरे शिवसेनेचे गद्दार आहेत,’ असा गंभीर आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज  केला. ‘मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे, शिवसेना वाचवायची असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, अन्यथा परब यांच्याविरोधात कोर्टात जाईन,’ असा इशाराही कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.

रत्नागिरी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीत कदम यांच्या समर्थकांना डावलल्यानंतर रामदास कदम आक्रमक होत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.

ते म्हणाले, ‘माझ्याकडून कधीही पक्षविरोधी कृत्य झालेले नाही. दोन नेत्यांचे वाद समाजासमोर येऊ नयेत असे वाटत होते म्हणून मी काही पथ्ये पाळली. अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहे. मागील दोन वर्षे ते १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येतात. त्यांनी शिवसेना वाऱ्यावर सोडले आहे. कुठलाही समन्वय नाही. मध्यंतरी किरीट सोमय्या यांच्यासंदर्भात संवाद केलेली कुठलीही बाब माझ्याकडून घडली नाही. किरीट सोमय्यांशी आजपर्यंत कधीही बोललो नाही. मध्यंतरी मिलिंद नार्वेकरांचा बंगला स्वत: तोडला. अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबतही तक्रारी झाल्या. मुळात त्यांनी हे रिसॉर्ट बेकायदा बांधलाच का? बेकायदा बांधकामे करायची आणि ते तोडले की माझ्यावर आरोप करायचे असा प्रकार सुरू आहे.

मी आयुष्यभर शिवसेनेसाठी मी लढलो आहे. बाळासाहेबांची शपथ घेतो की, मी किरीट सोमय्याला कागदपत्रे दिली नाहीत. मला संपवायचा डाव शिवसेनेतील काही नेत्यांचा आहे. अनिल परब यांनी बांद्र्यातून विधानसभेला निवडून येऊन दाखवावे, महापालिकेला निवडून येऊन दाखवा. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत असाल याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही एखाद्याला संपवायला मुखत्यार आहात, असा सवाल त्‍यांनी केला.

मला, मुलाला तिकीट मिळू नये, म्हणून अनिल परब यांनी सतत काम केले. स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून विरोधकांना सोबत घेऊन काम करत आहे. हा पक्षाशी गद्दारी करतोय. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत योगेश कदम हे स्थानिक आमदार आहेत. त्यांनी सर्वांसोबत घेऊन पक्षाला कळविल्या. तेथे आम्ही पक्षाचा भगवा झेंडा फडकविला. मात्र, ज्‍यांनी भगव्‍या झेंड्याचा अपमान केला त्यांना सोबत घेऊन सध्या आमच्याविरोधात काम केले जात आहे. तेथे शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घातली जात आहे. शिवसेनेला गहान ठेवणारे अनिल परब, शिवसेनेच्या मुळावर उठणारे, राष्ट्रवादीच्या घशात घालणारा अनिल परब कसा निष्ठावंत असेल? असा सवाल करत कदम यांनी परब यांच्यावर गंभीर आरोप केले.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवता येत नाही. मात्र, मला व माझ्‍या मुलाला संपवायला रत्नागिरीत येऊन ते तीन दिवस ठाण मांडून होते. परब आणि सामंताविरोधात तक्रार देऊनही काही होत नाही. कठोर, निष्ठावंत शिवसैनिक असूनही दखल घेतली जात नाही हे वेदनादायी आहे, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

सुभाष देसाई यांचे नाव यादीत कसे?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत असताना नव्या मंत्रिमंडळाच्या चर्चेसाठी आम्ही शिवसेना भवनात बैठकीत सांगितले होते की, ज्येष्ठांना मंत्रिपदे नकोत. दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि मला बाजुला ठेवून नव्यांना संधी देण्याबाबत सुचविले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्याला होकार दर्शविला; पण यादी आली तेव्हा मात्र, सुभाष देसाई यांचे नाव पहिल्यांदा होते, असेही त्‍यांनी सांगितले.

अनिल परब रामदास कदम : कोकण हा बालेकिल्ला

कोकण हा शिवसेनाचा बालेकिल्ला आहे.  तो अनिल परब आणि उदय सामंत हे दोघे संपवत आहेत. या दोघांचा काहीही संबंध नसताना ते दोघे शिवसेना संपविण्यासाठी ठाण मांडून बसत आहेत. शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घातली जात आहे. स्थानिक आमदारांना निधी दिला जात नाही. सुनील तटकरे यांच्या नादी लागून तेथे काँग्रेसला डावलून युती करायची आणि शिवसेनेने नमते घ्यायचे असे सुरू आहे. कोकणातील शिवसेना संपवली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

माझी मुले निर्णय घ्यायला सक्षम

मी शिवसैनिक म्हणून ५२ वर्षे काम केले. यापुढेही करेन. पण, मला संपवायचा आणि गाडायचा कुणी प्रयत्न केला तर मी सहन करणार नाही. माझी पक्षातून हकालपट्टी केली तरी मी कायम शिवसैनिक म्हणून राहीन. मात्र, माझी मुले आता कर्ती  आहेत. त्यांचे करिअर आहे. ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत, असे सूचक विधानही कदम यांनी केले.

हेही वाचा : 

Back to top button