

पुणे: शहरातील प्रमुख रस्ते आणि पदपथांवर पादचाऱ्यांसाठी जीवघेणे आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे महावितरणचे ‘फीडर पिलर’ स्थलांतरित करण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने महावितरणकडे वारंवार तगादा लावला असला, तरी महावितरणने मात्र हात झटकले आहेत. ‘फीडर पिलर’ स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याचे सांगत महावितरणने या कामाचा संपूर्ण आर्थिक भार थेट महापालिकेच्या माथी मारला आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी लागणारे 1.3 टक्के पर्यवेक्षण शुल्कही (सुपरव्हिजन चार्जेस) महापालिकेनेच भरावे, असे पत्र पाठवून महावितरणने महापालिकेलाच कोंडीत पकडले आहे.
शहरात आजघडीला सुमारे एक लाखाच्या आसपास फीडर पिलर आहेत. शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर किंवा पदपथांच्या मध्यभागी हे पिलर उभारण्यात आले आहेत. गर्दीच्या बाजारपेठा, शाळा-महाविद्यालयांचे परिसर आणि निवासी भागांतील पदपथांवर हे पिलर पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, रस्तारुंदीकरणात आणि स्मार्ट रस्ते प्रकल्पांच्या कामातही मोठे अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागाने हे पिलर त्वरित स्थलांतरित करावेत, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. तसेच ‘पुणे शहर परिवर्तन समिती’च्या बैठकीतही यावर सविस्तर चर्चा झाली होती.
महावितरणचे महापालिकेला पत्र
महावितरणच्या रास्ता पेठ शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी महापालिकेला एक पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, निधीअभावी महावितरण स्वतःच्या खर्चाने हे पिलर स्थलांतरित करू शकत नाही. ‘पुणे ग््राँड टूर सायकल स्पर्धा’ आयोजनाच्या निमित्ताने शहरातील 32 रस्त्यांवरील सुमारे 1322 फिडर पिलर व इतर विद्युत यंत्रणा स्थलांतरित करण्यासाठी अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता महापालिकेने स्वतःच्या पथ आणि विद्युत विभागामार्फत हा खर्च करून हे काम करून घ्यावे. तसेच महावितरणला नियमानुसार 1.3 टक्के पर्यवेक्षण शुल्क अदा करावे, असे महावितरणने पत्रात नमूद केले आहे.
पिलर हटवण्याबाबत महावितरणने झटकले हात
वाहतुकीला अडथळा ठरणारी फीडर पिलर हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महावितरणने स्वतःच्या खर्चाने ‘फीडर पिलर’ स्थलांतरित करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. मात्र, निधी नसल्याचे कारण देत ‘महावितरण’ने हात वर केले आहेत.
फीडर पिलर स्थलांतरित करण्यास मिळेना जागा
शहरात जवळपास लाखभराच्या आसपास महावितरणचे फीडर पिलर आहेत. हे फीडर पिलर पदपथांवर तर काही ठिकाणी रस्त्यांच्या कडेला आहेत. वाहतुकीला याचा अडथळा ठरत आहे. पावसाळ्यात तर यातील करंट रस्त्यावरील पाण्यात उतरून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे फीडर पिलर स्थलांतरित करणे गरजेचे आहे. मात्र, जागाच नसल्याने ते स्थलांतरित कोठे करायचे हा प्रश्न आहे. सध्या महापालिकेचा रस्ते विभाग, विद्युत विभाग व महावितरणमार्फत सर्वेक्षण सुरू असून, यानंतर याबाबतचा निर्णय होणार आहे.
महापालिका आणि महावितरण या दोन्ही यंत्रणांनी फीडर पिलर हटवण्याचा खर्च निम्मा निम्मा उचलण्याचे प्राथमिक स्तरावर निश्चित केले होते. मात्र, आता संपूर्ण खर्च, पर्यवेक्षण शुल्क महापालिकेनेच द्यावे, असे पत्र महावितरणकडून प्राप्त झाले आहे. मात्र, हे पालिकेला शक्य नाही. फीडर पॉइंटची संख्या मोठी आहे. सध्या सर्वेक्षण सुरू आहे.
मनीषा शेकटकर (प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महापालिका)