

पुणे: पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, पावसाळी गटारे, स्टॉर्म वॉटरलाइन्स आणि कल्व्हर्ट्सची सफाई 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या महापालिकेला ही मुदत पाळण्यात अपयश आले. त्यामुळे ही डेडलाइन आता 15 जूनपर्यंत वाढवली आहे. उर्वरित सर्व कामे त्या कालावधीत पूर्ण केली जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरातील नालेसफाईचे 85 टक्के, पावसाळी गटारसफाईचे 59 टक्के आणि चेंबर्ससफाईचे 63 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे अद्याप अपूर्ण आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने उर्वरित कामांचा वेग वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत 129 नाले असून, त्यांची एकूण लांबी 2 लाख 34 हजार 512 मीटर आहे. यापैकी 2 लाख 21 हजार 500 मीटर नाल्यांची सफाई करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 55 हजार 391 मीटर नाल्यांची स्वच्छता केली असून, 1 लाख 67 हजार 59 मीटर नाल्यांची सफाई अद्याप बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दररोज सरासरी 3,512 मीटर नाले साफ केले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
158 संवेदनशीलपैकी 21 ठिकाणी कामे अपूर्ण
शहरातील 457 कल्व्हट्र्सपैकी 158 ठिकाणे पूर आणि पाणी साचण्याच्या दृष्टीने संवेदनशील मानली जातात. या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात गंभीर समस्या निर्माण होतात. मात्र, अशा 21 ठिकाणी अद्याप आवश्यक कामे पूर्ण झालेली नाहीत. प्रशासन दररोज 24 कल्व्हट्र्सची सफाई करीत असल्याचा दावा करीत असले तरी कामांचा वेग अपेक्षेप्रमाणे नसल्याची चर्चा आहेर्.ें
स्टॉर्म वॉटरलाइन आणि चेंबरसफाईही संथगतीने
पावसाचे पाणी जलदगतीने वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या स्टॉर्म वॉटरलाइन्सच्या सफाईचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नाही. 2 लाख 40 हजार 116 मीटर लाइनपैकी 1 लाख 51 हजार 525 मीटर लाइनची सफाई झाली असून, 37 टक्के काम बाकी आहे. तसेच, शहरातील 42 हजार 394 चेंबर्सपैकी केवळ 18 हजार 301 चेंबर्सची सफाई पूर्ण झाली आहे.
पावसाळ्यापूर्वी विविध विभागांमार्फत 49 प्रकारची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी वाहतुकीच्या अडचणींमुळे कामांच्या गतीवर परिणाम झाला. कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात लेखी तक्रारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, नालेसफाईतून काढलेला गाळ व कचरा तातडीने उचलण्याचे आदेश दिले असून, 15 जूनपर्यंत सर्व कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
प्रजित नायर, अतिरिक्त आयुक्त