

पुणे: पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांत ज्येष्ठ नागरिकांकडील पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले आहेत. कोथरूड तसेच पाषाण परिसरात या घटना घडल्या. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
कोथरूडमधील पौड रस्ता परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाकडे पोलिस असल्याचे सांगून चोरट्यांनी त्यांच्याकडील चार लाख आठ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. 3 मे) घडली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ज्येष्ठ नागरिक हे सेनापती बापट रस्त्यावरील जनवाडी परिसरात राहायला आहेत. रविवारी सकाळी 9 च्या सुमारास ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची पत्नी दुचाकीने भूगावला निघाले होते. पौड रस्त्यावरील जैन लोहिया आयटी पार्कसमोरील पीएमपी थांब्याजवळ चोरट्यांनी दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाला अडविले. पोलिस असल्याची बतावणी केली.
या भागात ज्येष्ठांना लुटण्यात येते. तुमच्याकडील दागिने काढून ठेवा, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्याकडील चार लाख रुपयांची सोनसाखळी कागदात बांधून ठेवण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून सोनसाखळी लांबवून चोरटे पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करीत आहेत.
पाषाण-सूस टेकडी परिसरात ज्येष्ठ नागरिकाकडे पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची अंगठी आणि सोनसाखळी असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.