

पुणे: पोलिस असल्याचे सांगून व्यावसायिकाकडील एक कोटी रुपये लुटण्याच्या प्रयत्नाचे प्रकरण आता थेट राजगड पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या खेड शिवापूर पोलिस चौकीपर्यंत पोहोचले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा आरोपी व्यावसायिकाला खेड शिवापूर पोलिस चौकीत घेऊन पोहोचले तेव्हा तेथील एका पोलिसाने त्या बॅगेतील काही पैसे तोतया पत्रकाराकडे फेकले. मात्र, हे काही आपल्याला आता पचणार नाही, हे लक्षात येताच पुन्हा ते पैसे त्या बॅगेत ठेवण्यात आले. पैशांच्या या फेकाफेकीत एका व्यक्तीचा पाय देखील फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. प्रकरण अंगलट येण्याचे चिन्ह दिसताच परत पैशांची जुळवाजुळव करून नऱ्हे पोलिसांकडे सोपविण्यात आले.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोलिस चौकीत एक महिला पोलिस अंमलदार आहेत. त्यांच्या ओळखीचे हे तोतया पत्रकार असल्याचे समजते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकार घडला आहे तो पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत. मात्र, आरोपी पोलिस असल्याचे सांगून व्यावसायिकाला खेड शिवापूर पोलिस चौकीत घेऊन गेले. त्यामुळे या चौकीतील कोणी पोलिस कर्मचारी तर या लुटीच्या प्रकरणात अगोदरपासूनच सहभागी तर नव्हते ना, असा देखील सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी राजगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष जाधव यांच्याकडून याबाबतचा सविस्तर अहवाल मागितला आहे. जाधव यांनी तो अहवाल गिल यांना सादर केला असून, तो पाहिल्यानंतरच खेड शिवापूर पोलिस चौकीत त्या दिवशी नेमकं काय झालं हे समजू शकेल, असे गिल यांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास नऱ्हे पोलिसांकडे आहे. यातील विक्रम चाकणकर, अमेय कार्ले, गणेश कदम या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाची ओळख देखील नऱ्हे पोलिसांनी पटवली असून, त्याची भूमिका यामध्ये काय याचा तपास सुरू आहे.
परदेशी नावाच्या एका व्यक्तीचे देखील नाव या प्रकरणात समोर आले आहे. त्यामुळे त्याचासुद्धा पोलिस शोध घेत आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, तोतया कथित पत्रकाराला ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश नऱ्हे पोलिसांना दिले आहेत. मुळात चाकणकर, अमेय कार्ले, गणेश कदम आणि बटर उर्फ गाडे या कटात सहभागी असल्याने, चाकणकरने गाडी खेड शिवापूर पोलिस चौकीत नेली. मात्र, डाव अंगलट येण्याची चिन्हे दिसताच त्यांनी व्यावसायिकाचे पैसे परत दिले. त्यानंतर राजगड पोलिसांनी व्यावसायिकाला नऱ्हे पोलिसांकडे पाठवून दिले.
नेमका काय आहे प्रकार?
सिंहगड रस्त्यावर शनिवारी (दि.१८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलिस असल्याचे सांगून एका व्यावसायिकाकडील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी, व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षवर्धन पवार व त्यांचे सहकारी किरण आपटे हे विक्रम चाकणकर याच्या कारमध्ये बसून नऱ्हे येथील एचडीएफसी बॅंकेच्या दिशेने नवले ब्रिजवरून जात होते. त्या वेळी अचानकपणे दुचाकीवरून काही जण आले त्यांनी कारला त्यांच्या दुचाकी आडव्या घातल्या. यावेळी अमेय कार्ले हा कारजवळ येऊन, "आम्ही पोलिस आहोत. तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात, याची आम्हाला माहिती आहे," असे सांगत कारचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी कारमधील हिरव्या रंगाची बॅग आणि आणखी एक बॅग ज्यात एकूण एक कोटी रुपये होते ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकार केल्याने आरोपींचा डाव फसला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.