TET Exam | ‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्‍नतीचा मार्ग मोकळा!

३१ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश मिळणार
TET Exam  |
TET Exam | ‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्‍नतीचा मार्ग मोकळा!File Photo
Published on
Updated on

पुणे : शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पदोन्‍नतीसाठी महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे. १ सप्टेंबर २०२५ पूर्वी ‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्‍नतीचा लाभ मिळत होता. आता दरवर्षी १ ऑगस्टपर्यंत ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेल्या सर्व शिक्षकांना पदोन्‍नतीचा लाभ मिळणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पदोन्‍नती प्रक्रिया पूर्ण करून शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे हजारो ‘टीईटी’-‘सीटीईटी’ पात्रताधारक शिक्षकांना पदोन्‍नतीची संधी उपलब्ध झाली आहे.

राज्य सरकारने १४ मे रोजी काढलेले पत्र रद्द करून नवीन सुधारित नियमावली आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्‍नती प्रक्रियेला गती मिळावी आणि प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर पूर्ण व्हावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पदोन्‍नती समितीची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत उमेदवारांचा सेवा कालावधी, ‘टीईटी’-‘सीटीईटी’ पात्रता आणि इतर आवश्यक निकष तपासले जातील.

नवीन वेळापत्रकानुसार, दरवर्षी १ जानेवारी रोजी तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल. हरकती स्वीकारून ३१ जानेवारीपर्यंत अंतिम यादी जाहीर केली जाईल. १५ ते २२ फेब्रुवारीदरम्यान समितीची बैठक घेऊन शिफारस करण्यात येईल.

नियमावली अंमलबजावणीची जबाबदारी सीईओंवर

या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना पदोन्‍नतीचा नियमित आणि विश्वासार्ह मार्ग उपलब्ध झाला आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात एकसूत्री धोरण राबविले जाईल, याची दक्षता घेण्यात येत आहे. यामुळे शिक्षकांच्या मनातील असंतोष दूर होईल आणि शालेय शिक्षण व्यवस्थेला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news