

पुणे: भाजपच्या विजयाचा जबरदस्त झंझावात सुरू असताना शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकमेव जागा मिळाली ती प्रभाग क्रमांक 16 ‘क’ हडपसर-सातववाडीमध्ये. नितीन गावडे या 46 वर्षांच्या शिवसैनिकाने ही विजयश्री खेचून आणली. अटीतटीच्या लढतीत त्यांनी भाजपचे उमेदवार संदीप दळवी यांचा पराभव केला. शहरात शिवसेनेची (उबाठा) एकमेव जागा गावडे यांच्या रूपाने निवडून आली.
नितीन गावडे यांचा प्रवास प्रचंड संघर्षाचा आहे. ते मूळचे सासवड येथील सोनोरी गावचे. त्यांचे वडील निवृत्ती गावडे हे पुण्यात आले आणि त्यांनी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. हडपसर-सातववाडी भागात लहानाचे मोठे झालेले नितीन यांनी राजकारणात येण्याचे स्वप्न पाहिले नव्हते.
नोकरी करायची नाही इतकेच स्वप्न होते; पण...
नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा, इतकेच त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे बीएसएनएलच्या कामाचे कंत्राट, फिटनेस क्लब, असा व्यवसाय केला. त्यात यशस्वी होत असताना वॉर्डमधील दूषित पाणी, ड्रेनेजलाइनची दुरवस्था पाहून 2017 पासून पूर्ण वेळ समाजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेचे काम सुरू केले.
या निवडणुकीत पैसा न वाटताही मी 8 वर्षे केलेल्या कामामुळे निवडून येऊ शकलो. कारण, माझ्या प्रचाराची धुरा मतदारांनीच हाती घेतली. आमच्या प्रभागात सतत दूषित पाणी आणि खराब ड्रेनेजलाइन या मोठ्या समस्या आहेत. नागरिकांची छोटी-छोटी कामे केल्याने मी भाजपच्या लाटेतही शिवसेनेची मशाल तेवत ठेवू शकलो.
प्रभागात करणार ही कामे...
प्रभाग 5 वर्षांत अत्यंत चांगल्या प्रकारे करून दाखवणार. यात स्वच्छ पिण्याचे पाणी, चांगल्या ड्रेनेजलाइन, टँकरमुक्त प्रभाग करण्याचा प्रयत्न करणार.
प्रभागात 100 बेडचे शासकीय रुग्णालय, तरुणांसाठी क्रीडांगण.
स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र वाचनालय, तरुणांसाठी रोजगार कौशल्य, तर महिलांसाठी चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे उभारणार.