Pune Drugs Case | सोशल मीडियात जाहिरात; मागच्या दाराने एन्ट्री

वकिलांची न्यायालयात माहिती; आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
A protest was held on Monday on behalf of the MNS to demand action against the pub
पबविरोधात कारवाईच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आलेPudhari

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लीझर लाउंज (एल-थ्री) पबमध्ये आयोजित पार्टीची व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामवरून जाहिरात करण्यात आली होती. व्यवस्थापनाला इमारतीच्या तळमजल्यावर पब चालविण्याचा परवाना देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात बेकायदेशीररीत्या दुसर्‍या मजल्यावर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पुढच्या दाराने प्रवेश न देता मागच्या दाराने प्रवेश देण्यात आला. पार्टीच्या दिवशी अल्पवयीन युवकांनी पबच्या टॉयलेटमधील कमोडवर अमली पदार्थसद़ृश्य पदार्थांचे सेवन केल्याची माहिती सहायक सरकारी वकील प्रियंका वेंगुर्लेकर यांनी न्यायालयाला दिली.

प्रथमदर्शनी तपासात समोर आलेल्या बाबी

  • इव्हेंट मॅनेजर अक्षय कामठे याने केले होते पार्टीचे आयोजन.

  • व्हॉट्सअ‍ॅपसह सोशल मीडियाद्वारे पार्टीसाठी आमंत्रण.

  • पार्टीचे प्रवेश शुल्क ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात स्वीकारले.

  • व्हायरल व्हिडीओ पबमधील असल्याची आरोपींची कबुली.

  • संतोष कामठे, रवी माहेश्वरीविरोधात यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल.

  • बारमधून तीन लाखांचा दारूसाठा जप्त.

  • बार बंद करण्याची वेळ झाल्यानंतर आलेल्यांना मागच्या दाराने प्रवेश.

  • प्रवेश देतेवेळी राजू गायकवाड याची प्रवेशद्वारावर उपस्थिती.

आरोपींना चार दिवस पोलिस कोठडी

एल-थ्री या पबमध्ये काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बारच्या जागेचे मालक संतोष विठ्ठल कामठे (रा. 447/4, रंजनीगंध अपार्टमेंट, शिवाजीनगर), बार चालविण्यासाठी घेतलेले उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. साईप्रसाद अपार्टमेंट, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. दवन सोसायटी, भूगाव, मुळशी), रवी माहेश्वरी (रा. एच 1006, 382 पार्क, मॅजिस्ट्रिक, उंड्री), पार्टीचे आयोजन केलेला अक्षय दत्तात्रय कामठे (रा. हडपसर माळवाडी), डीजे दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तर पार्टीच्या आयोजनात सहभागी झालेले रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) आणि मानस पस्कूल मल्लिक (वय 33, रा. जयजवाननगर, येरवडा) यांना अटक करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

A protest was held on Monday on behalf of the MNS to demand action against the pub
Pune Drugs Case | तरुणींकडून ड्रगसेवन; पुण्यात 'व्हायरल व्हिडीयो'ने उडवली खळबळ

सरकारी वकील काय म्हणाले?

न्यायालयात आरोपींना हजर केल्यानंतर सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सहायक सरकारी वकील वेंगुर्लेकर म्हणाल्या, हॉटेलमध्ये अमली पदार्थांसारखा पदार्थ ग्राहकांना दिला असल्याचे सोशल मीडियाद्वारे दिसून आले आहे. त्याअनुषंगाने घटनास्थळावरील नमुने प्राप्त केले असून, त्याचा तपास करायचा आहे, आरोपींनी अमली पदार्थाचे सेवन केले आहे किंवा कसे याबाबत त्यांची वैद्यकीय तपासणी करून अहवाल प्राप्त करायचा आहे, आरोपींनी त्यांच्या अनुज्ञप्तींचे उल्लंघन करून दुसर्‍या जागेत दारूचा गुत्ता सुरू केल्याचे गैरकायदेशीर कृत्य केले आहे.

बारमध्ये मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा मिळून आला असून, याव्यतिरिक्त आरोपींनी अन्य ठिकाणीसुद्धा अवैध मद्याचा साठा केला असण्याची शक्यता असून, गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अ‍ॅड. वेंगुर्लेकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपींना 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बचाव पक्षातर्फे जी. एन. अहिवळे, राजेश कातोरे, विक्रम नेवसे, मनीष पडेकर, तौसिफ शेख यांनी काम पाहिले.

आरोपींचे तपासास असहकार्य

अटक आरोपींपैकी दोघांवर यापूर्वी गुन्हा दाखल आहे. संतोष विठ्ठल कामठे याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणूकसह विविध कलमांनुसार, तर रवी दिनेश महेश्वरीवर कोंढवा पोलिस ठाण्यात सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यांना पोलिस तपासाची माहिती आहे. आरोपींना तपासासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले असता त्यांनी माहिती दिली नाही, अशी माहिती तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयास सांगितले.

A protest was held on Monday on behalf of the MNS to demand action against the pub
Pune Drugs Case | एल-3 पबला ठोकले टाळे

तिघांचे रक्तांचे नमुने घेतले, इतरांची होणार चाचणी

लिक्विड लीझर लाउंज (एल-थ्री) मध्ये पार्टीसाठी आलेल्यांना अमली पदार्थासारखा पदार्थ देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अटक आरोपींवर कारवाई केल्यानंतर तिघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्याचा अहवाल आल्यानंतर इतरांचीही चौकशी होणार असून, त्यानुसार या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात येणार आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुलांनाही अमली पदार्थ देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. कराराचे पालन होत आहे की नाही हे पाहणे बारच्या जागामालकाची जबाबदारी होती. त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.

सहा वेटर्सही पोलिस कोठडीत

पोलिसांपाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘एल-थ्री’ बारमध्ये छापा टाकून सव्वा तीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला. तसेच, सहा वेटरना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. या सहा आरोपींनाही न्यायालयाने 29 जूनपर्यंत उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मोहित राजेश शर्मा (वय 29, मूळ रा. सेमरा रोवा, मध्य प्रदेश), अमीर असफ अली हुसैन (वय 27, मूळ रा. नागाव, आसाम), सौरव शेखर बिसवास (वय 25, मूळ रा. 24 परगणा, पश्चिम बंगाल), खैरूल इस्लाम समसुलहक (वय 22, मूळ रा. होजाई, आसाम), कोहिमुद्दीन इलाम शेख (वय 30, मूळ रा. नाडिया, पश्चिम बंगाल) आणि नरूल इस्लाम ताहिरुद्दीन (वय 22, मूळ रा. नागाव, आसाम, सर्व सध्या रा. शिवाजीनगर) अशी कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत. ‘एल-थ्री’ बारमध्ये झालेल्या वादग्रस्त पार्टीतील ग्राहकांना या आरोपींनी बेकायदा मद्य ‘सर्व्ह’ केले होते. त्यांची चौकशी करून अन्य आरोपींनाही अटक करायची आहे, असे तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात सांगितले.

संघटनेकडून जोरदार घोषणाबाजी

पतित पावन संघेटच्या वतीने सोमवारी लिक्विड लेझर लाउंज (एल-थ्री) समोर आंदोलन करीत दगडफेक करीत तोडफोड करण्यात आली आहे. या वेळी संघटेनच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news