

पांडुरंग सांडभोर
पुणे: महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभागरचना सत्ताधारी भाजपला अनुकूल असल्याचे चित्र आहे. तर, या रचनेत काही ठिकाणी शिवसेनेला भाजपची साथ मिळाली असल्याचे दिसून येत असले, तरी महायुतीत असून, राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र कोंडी केली असल्याचे अनेक प्रभागांच्या रचनेवरून स्पष्ट होत आहे. तर, काही प्रमुख महाविकास आघाडीतील विरोधकांना थेट कात्रजचा घाट दाखविण्यात आल्याचेही चित्र या रचनेतून दिसून येत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी सायंकाळी उशिरा झाली आहे. या प्रारूप रचनेचे नकाशे प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तरी भाजपने प्रभागरचनेतच बाजी मारल्याचे स्पष्ट होत आहे. (Latest Pune News)
प्रामुख्याने भाजपला अनुकूल असलेल्या कसबा पेठ, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर तसेच पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघांतील प्रभागांची रचना करताना लोकसंख्येच्या दृष्टीने छोटे प्रभाग करण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघांत प्रभागांची संख्या वाढवून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे नियोजन करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
तसेच, 2017 ला ज्या प्रभागांत भाजपचेच चार सदस्य निवडून आले होते, त्याच प्रभागांची रचना पुन्हा किरकोळ बदल वगळता पुन्हा तशीच कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे अनेक माजी ज्येष्ठ नगरसेवक सुरक्षित झाल्याचे चित्र आहे.
शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह बापट, टिळक, मिसाळ यांच्या कुटुंबांतील इच्छुकांचा मार्ग सोपा झाला आहे. त्यामुळे मध्यवस्तीमधील मतदारसंघांत भाजपने निवडणुकीआधीच आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
प्रामुख्याने कोथरूड मतदारसंघातील जुन्या प्रभागांच्या रचनेत फारसे बदल झाले नाहीत. केवळ प्रभाग क्र. 9, सूस, बाणेर-पाषाण या प्रभागाला समाविष्ट गावांचा भाग जोडण्यात आला आहे. मात्र, या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण आल्यास भाजपमधील इच्छुकांमधील उमेदवारीची चुरस आणखी वाढण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांचा कस लागणार आहे.
शिवाजीनगरला हेच चित्र आहे. या मतदारसंघातील प्रभाग क्र. 7, गोखलेनगर- वाकडेवाडी, प्रभाग क्र. 8 - औंध-बोपोडी यांची रचनाही पूर्वीप्रमाणेच जवळपास कायम आहे. या प्रभागात माजी नगरसेवक सनी निम्हण, बंडू ढोरे यांचा मार्ग सुकर झाला आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट
मध्यवस्तीमधील पुणे कॅन्टोन्मेंटमधील काशेवाडी-भवानी पेठला डायस प्लॉटचा भाग जोडला गेला आहे. तर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची कोंडी करण्यासाठी त्यांच्या जुन्या प्रभागाची मोठी तोडफोड करण्यात आली आहे. नव्या रचनेत शिंदे यांचा प्रभाग नदीची हद्द ओलांडून थेट येरवड्यातील साळवेनगरपर्यंत जोडला गेला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे माजी गटनेते संजय भोसले आणि शिंदे थेट एकाच प्रभागात एकत्र आले आहेत. भोसले यांच्यासाठी नवीन रचना कस लावणारी ठरणारी आहे. तर, कॅन्टोन्मेंटची हद्द असल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना मात्र नव्या रचनेत फारसा फटकाबसलेला नाही.
पर्वती मतदारसंघ
पर्वती मतदारसंघात प्रभाग क्र. 36, सहकारनगर-पद्मावती प्रभाग क्र. 21 मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क यांची रचना थोडेफार अपवाद वगळता कायम आहे. पालिकेने शासनाला सादर केलेल्या प्रारूप रचनेत सॅलिसबरी पार्कचा प्रभाग त्रिसदस्यीय केला होता. मात्र, शासनाने तीनचा प्रभाग रद्द केला. या प्रभागात भाजपचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे चिरंजीव करण मिसाळ, माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले हे इच्छुक असून, या ठिकाणी उमेदवारीसाठी आता भाजपमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे.
वडगाव शेरी मतदारसंघ
वडगाव शेरी मतदारसंघातील नवी रचना हा भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीचा थेट सामना होणारी ठरली आहे. प्रभाग क्र. 1 कळस-धानोरीची रचना पूर्वीप्रमाणे कायम राहिली असून, त्याला नव्याने समाविष्ट लोहगावचा काही भाग जोडला आहे. तर प्रभाग क्र. 2 फुलेनगर-नागपूर चाळ रचनाही जवळपास पूर्वीसारखीच असून, या प्रभागात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचे बंधू इच्छुक आहेत. मात्र, 2017 प्रमाणे पुन्हा टिंगरे यांच्या हक्काचा भाग असलेल्या टिंगरेनगर-विद्यानगरचा बर्माशेल झोपडपट्टीचा भाग पुन्हा तोडून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर प्रभाग क्र. 3 विमाननगर-लोहगाव या प्रभागाची रचना थेट विमानतळापासून लोहगाव आणि पुढे वाघोलीचा काही भाग जोडला गेला आहे.
तसेच, या प्रभागाला पूर्वीचा नगर रस्त्याच्या उजव्या बाजूचा सोमनाथनगर भाग जोडला गेला आहे. तर प्रभाग क्र. 4 खराडी-वाघोली असा झाला असून, यात विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबातील इच्छुकांना ही रचना अनुकूल अशी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाघोलीतील सर्वपक्षीय इच्छुकांची मात्र कोंडी होणार आहे.
तर प्रभाग क्र. 5 कल्याणीनगर-वडगाव शेरी हा जुन्या रचनेप्रमाणे कायम झाला असून, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे बंधू स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांच्यासाठी सुरक्षित अशी रचना ठरली आहे. त्यामुळे या प्रभागातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांचा मात्र कस लागेल, असे चित्र आहे.
प्रभाग क्र. 6 येरवडा-गांधीनगर या प्रभागाला गांधीनगरचा भाग नव्याने जोडला गेला असून, ही रचना महाविकास आघाडीला अनुकूल ठरणारी आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील नव्याने समाविष्ट लोहगाव आणि वाघोलीचे प्रत्येकी दोन तुकडे झाले. येथील राजकीय इच्छुकांच्या स्वप्नांना सुरुंग लावला गेला आहे.
खडकवासला मतदारसंघ
खडकवासला मतदारसंघातही जुन्या रचनांमध्ये फारसा बदल झालेला नाही. मात्र, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या जुन्या प्रभाग क्र. 38 चे थेट पाच तुकडे झाले आहेत. त्यामुळे धनकवडे यांची कोंडी झाली आहे. या मतदारसंघातील नर्हे- वडगाव बुद्रुक हा प्रभाग भौगोलिक दृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठा प्रभाग बनला आहे. त्याला समाविष्ट गावांचा भाग या प्रभागाला जोडला आहे.
धंगेकर-बिडकर पुन्हा एकाच प्रभागात
कसबा मतदारसंघातील एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर व माजी सभागृहनेते गणेश बिडकर पुन्हा प्रभाग क्र. 24 कमला नेहरू हॉस्पिटल-मंगळवार पेठ-रास्ता पेठ या प्रभागात एकत्र आले आहेत.
महापालिकेकडून प्रारूप प्रभागरचना शासनाला सादर करताना त्यामध्ये रास्ता पेठ-मंगळवार पेठ हा त्रिसदस्यीय प्रभाग करण्यात आला होता. मात्र, शासनाने तीन सदस्यांचे प्रभागच रद्द केले. त्यामुळे रचनेत झालेल्या बदलाने पुन्हा धंगेकर-बिडकर एकत्र आले आहेत. आता धंगेकरांची पत्नी निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत असून, बिडकर हे स्वत: निवडणूक लढणार आहेत. आरक्षण सोडतीनंतरच या प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
हडपसर मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या काही प्रमुख माजी नगरसेवक इच्छुकांची या प्रारूप रचनेत कोंडी करण्यात आली आहे. अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीने निवडणूक होणार आहे. नवीन प्रारूप रचनेत झालेल्या कोंढवा खुर्द-कौसरबाग या प्रभागात राष्ट्रवादीचे इच्छुक माजी नगरसेविका नंदा लोणकर, रईस सुंडके, हाजी गफूर पठाण, फिरोज शेख, प्रसाद बाबर हे सर्व एकाच प्रभागात आल्याने उमेदवारीचा मोठा पेच निर्माण होणार आहे.
तर प्रभाग क्र. 14 कोरेगाव पार्क-मुंढवा हा प्रभाग थेट मगरपट्टापासून मुंढवा आणि कोरेगाव पार्कपर्यंत एकत्र झाल्याने या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादीच्या गायकवाड, तुपे, मगर, कोद्रे या कुटुंबांतील या सर्वांची कोंडी केली.
शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनाही महंमदवाडी- उंड्री हा समाविष्ट गावांचा अनुकूल असा प्रभाग झाला आहे. सर्वांत मोठ्या पाचसदस्यीय प्रभागात कात्रज शिवसेनेच्या अमृता बाबर, शिवसेना ठाकरे गटाचे वसंत मोरे, राष्ट्रवादीचे प्रकाश कदम, युवराज बेलदरे आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या स्मिता कोंढरे हे सर्वपक्षीय माजी नगरसेवक इच्छुक एकत्र आले आहेत.
त्यामुळे प्रत्येकाचा या प्रभागात कस लागणार आहे. तर टिळेकर कुटुंबीयांचे प्राबल्य असलेल्या परिसराचा प्रभाग 40 हा कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी प्रभाग भाजपसाठीच अनुकूल असा झाला आहे. मात्र, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या प्रभागाची मोडतोड करून त्यांना अडचणीत आणण्यात आले आहे.