

पुणे: काँग्रेससह इंडिया आघाडीने घोषित केलेले उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे नक्षलवादाचे समर्थक आहेत, असा आरोप छत्तीसगडचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी एका व्याख्यानात केला. त्यांनी स्लाईडशोद्वारे बीजिंग ते बस्तरपर्यंत माओवाद हा नक्षलवादाच्या रूपांत कसा पोसला गेला यांचे व्हिडीओ दाखवत मांडला.
शहरातील एरंडवण भागातील एसएनडीटी विद्यापीठाच्या सभागृहात छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांचे छत्तीसगडमधील नक्षली आव्हानावर मात : धोरण -दृष्टी आणि अंमलबजावणी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन क?ण्यात आले होते. (Latest Pune News)
या वेळी व्यासपीठावर माजी खासदार तथा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, राज्याचे उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योजक सुधीर मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी स्लाईड शोद्वारे शर्मा यांनी छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात चीनमधील बीजिंगमधून माओवादी नक्षलवादी बनवून कसे तयार केले गेले याचा इतिहास कथन केला. या वेळी त्यांनी नक्षलवाद्यांची मोडस ऑपरेंडी सांगितली. भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून तो कसा संपुष्टात येत आहे, देशभरात बस्तर मॉडेल कसे प्रभावी ठरले आहे, याची माहिती दिली.
21 महिन्यांत शेकडो नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
त्यांनी सांगितले की, नक्षलवादी हे बंदुकीच्या जोरावर समांतर सरकार स्थापन करीत होते. ते आमच्या सरकारने 21 महिन्यांत मोडून काढले. आता शेकडो नक्षलवादी शरण येत असून झपाट्याने त्यांचे पुनर्वसन सरकार कसे करीत आहे हे सांगितले. त्यांनी बस्तर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी इतकी वर्षे गावक-यांच्या कशा नृशंस हत्या केल्या त्याचे फोटो दाखवले. शोले चित्रपटाच्या कहाणीप्रमाणे नक्षलवादी गावक-यांची कशी लूट करीत होते हे सांगितले.
शर्मा म्हणाले...
बस्तरमधील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करीत त्यांना घरे दिली. देशातून 2026 पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याची ही सुरुवात आहे. नक्षलवाद्यांची नसबंदी केली जात होती. ज्यांनी आत्मसमर्पण केले त्यांना पुढचे जीवन सामान्य माणूस म्हणून जगता यावे यासाठी त्यांना टेस्टट्यूब बेबीचा मार्ग दिला आहे.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या कहाण्या आता रेडिओवरून प्रसारित केल्या जात आहेत, त्यामुळे आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढत आहे. 21 महिन्यांत बस्तर जिल्ह्यातील 1600 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर 3 हजार नक्षलवाद्यांना अटक केली असून त्यातील 1500 नक्षलवादी आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत आहेत.