Pune Diwali Festival: पुण्यात दिवाळीचा उत्साह शिगेला; वसुबारसेपासून सात दिवस दीपोत्सवाची धूम

बाजारपेठा सजल्या, पूजा बॉक्सला सर्वाधिक पसंती; दिवाळीनिमित्त गुरुवारची साप्ताहिक पाणीकपात रद्द, इस्कॉन मंदिरात गोपूजन
Diwali
DiwaliPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळीच्या स्वागतासाठी घराघरांत तयारीची अन् सजावटीची लगबग, स्वयंपाकघरातून दरवळणारा फराळाचा सुगंध, बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह, रोषणाईने सजलेली दुकाने अन्‌ खरेदीसाठी बाहेर पडलेले कुटुंबीय...असे उत्साहपूर्ण वातावरण शहर आणि उपनगरांत पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या तेजोमयी पर्वाला गुरुवारपासून (दि.५) वसुबारसने सुरुवात होत असून, पुढील सात दिवस दिवाळीनिमित्त आनंदाची उधळण होणार आहे.

Diwali
Pune Zilla Parishad Teacher Recruitment: पुणे जिल्हा परिषदेत दुसऱ्या टप्प्यात १२९ शिक्षकांना नियुक्ती; आतापर्यंत ४४४ शिक्षक रुजू होणार

वसुबारसपासून सुरू झालेला दिवाळीच्या प्रकाशोत्सवाचा उत्साह बुधवार (दि. ११ नोव्हेंबर) भाऊबीजपर्यंत रंगणार आहे. पूजेपासून फराळाच्या मेजवानीपर्यंत, चिमुकल्यांच्या किल्ल्यांपासून ज्येष्ठांच्या स्नेहमेळाव्यांपर्यंत आणि भेटवस्तूंपासून नात्यांच्या गाठीभेटींपर्यंत अशा विविध रंगांनी दिवाळी साजरी होणार आहे. या सणाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळत असून, बुधवारी (दि.४) पूजेच्या साहित्यापासून कपड्यांपर्यंतच्या खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली.

Diwali
Maharashtra Idol Teachers List: महाराष्ट्रात ४ हजार ४८४ आयडॉल शिक्षकांची निवड; पुणे जिल्हा ४८७ शिक्षकांसह अव्वल

दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई किंवा खरेदीचा उत्सव नव्हे, तर कुटुंबीयांना एकत्र आणणारे, नात्यांमधील स्नेह वृद्धिंगत करणारे आणि आनंदाची देवाणघेवाण करणारे पर्व. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज अशा विविध सणांनी दिवाळीचे दिवस सजणार आहेत. गुरुवारी (दि.५) वसुबारस, शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) धनत्रयोदशी आणि यमदीपदान, रविवारी (दि. ८ नोव्हेंबर) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी साजरे होणार आहे. मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, तर बुधवारी (दि. ११ नोव्हेंबर) भाऊबीज साजरी होईल.

प्रत्येक दिवसाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्त्व वेगळे असल्याने या उत्सवात विविध परंपरांचा अनुभव घेता येणार आहे. वसुबारसेला गाय आणि वासराचे पूजन करून दिवाळीची सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजन केले जाईल. नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान, सुगंधी उटणे आणि पहाटेच्या मंगल वातावरणात दिवाळीचा आनंद साजरा होईल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांत लक्ष्मीची पूजा करून सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना केली जाणार आहे. दिवाळी पाडवा हा पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास जपणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते, तर पतीकडून भेटवस्तू दिल्या जातात. भाऊबीजला बहिणीच्या घरी जाणे, भावाचे औक्षण करणे आणि त्याला गोडधोड खाऊ घालणे, या परंपरेतून बहीण-भावाच्या नात्यातील जिव्हाळा व्यक्त होतो. सणातील प्रत्येक दिवस नवा उत्साह आणि आनंद घेऊन आला असून, घरोघरी सुख, समाधान आणि मांगल्याचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे. विविध संस्थांकडूनही दीपोत्सवाचे आयोजन केले आहे.

Diwali
Pollution Free Diwali Pledge: राज्यातील शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ; विद्यार्थ्यांना फटाके न वाजवण्याचे आवाहन

दिवाळीनिमित्त गुरुवारची साप्ताहिक पाणीकपात रद्द

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने गुरुवारी (दि.५) होणारी साप्ताहिक पाणीकपात रद्द केली आहे. त्यामुळे गुरुवारी शहरातील नागरिकांना नेहमीच्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दर गुरुवारी शहरात नियोजित पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. मात्र, दिवाळीच्या सणात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गुरुवारची पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. गुरुवारी शहरात नियमित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

दिवाळी पूजा बॉक्सला सर्वाधिक पसंती

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये पूजासाहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यंदा विविध पूजाविधींसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या दिवाळी पूजा बॉक्सला विशेष पसंती मिळत आहे. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडई, मार्केट यार्ड, रविवार पेठेतील बोहरी आळी यांसह विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. परिसरात पूजासाहित्याची दुकाने सजली आहेत. पूजेसाठी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या मूर्ती, हळद, कुंकू, अगरबत्ती, धूप, कापूर, नारळ, झेंडूची फुले, लक्ष्मीपूजनासाठी लागणारे तेल, तयार पणत्या, बोळकी, लक्ष्मीची पावले, रांगोळी, छोटी डायरी आणि पेन अशा विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. यंदाही स्वतंत्रपणे प्रत्येक साहित्य खरेदी करण्याऐवजी सर्व आवश्यक साहित्याचा समावेश असलेल्या पूजा बॉक्सला पसंती मिळत आहे. या बॉक्समध्ये अगरबत्ती, धूप, कापूर, हळदी-कुंकू आदी वस्तूंचा समावेश आहे. साधारणपणे २५० रुपयांपासून हे बॉक्स उपलब्ध आहेत. याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि प्रकारांचे सुगंधी उटणे आणि साबण खरेदी करण्याकडेही कल आहे. दिवाळीच्या तयारीसाठी महिला आणि युवतींकडून रांगोळी खरेदीलाही पसंती दिली जात आहे. बाजारात विविध रंगांच्या रांगोळ्यांसह पांढरी रांगोळी आणि आकर्षक रांगोळी स्टिकर्सचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Diwali
Indradev Maharaj Case: वृंदावनच्या इंद्रदेव महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; तृप्ती देसाई यांची अटकेची मागणी

यंदा पूजासाहित्याच्या दरात वाढ नाही

यंदा पूजासाहित्य खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः विविध प्रकारच्या अगरबत्ती आणि फुलांच्या तोरणांना अधिक मागणी आहे. अगरबत्तीचे अनेक नवीन प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. आयुर्वेदिक उटण्यांनाही लोक पसंती देत आहेत. यंदा पूजासाहित्याच्या दरात वाढ झाली नसल्याचे व्यावसायिक धनंजय घोलप यांनी सागितले आहे.

इस्कॉन मंदिरात आज गोपूजन

वसुबारसेनिमित्त कोंढवा येथील इस्कॉन एनव्हीसीसी मंदिरात गोपूजन, श्रीकृष्णदर्शन आणि नव्या पिढीशी संवाद, अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) सकाळी १०.३० वाजता होणार आहे. गोमातेचे महत्त्व, गोसंवर्धन, पर्यावरण, संस्कृती आणि जीवनमूल्ये, या विषयांवर या वेळी संवाद साधला जाणार आहे. तसेच ‘संस्कार ते संकल्प’ या संकल्पनेतून नव्या पिढीशी प्रेरणादायी संवाद आयोजित केला आहे. शिक्षण, आरोग्य, कला आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर या संवादात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात गोमातापूजन आणि मंदिर दर्शनाने होईल. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. दीपावलीची सुरुवात गोमाता आणि श्रीकृष्णाच्या सान्निध्यात करण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.