

पुणे: गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती. आता मंगळवारी (दि. २२) जिल्ह्यात ठिकठिकाणी, मध्यम, मुसळधार स्वरूपाच्या पवासाने हजेरी लावली. जिल्ह्यात जुलैमध्ये पाऊस झाला होता. त्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. श्रावणमध्ये नेहमीप्रमाणे पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. मात्र, हा महिना कोरडा गेला. दरम्यान, पाण्याअभावी खरीप हंगाम धोक्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह दूध उत्पादकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पिकांवर किडीसह रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता.
जिरायत भागातील स्थिती बिकट झाली होती. पावसाची शक्यता धूसर झाली होती. त्यामुळे सुकलेल्या सोयाबीन पिकावर काही शेतकऱ्यांनी नांगर फिरवला. गेल्या दोन दिवसांपासून मात्र चित्र बदलेले दिसत आहे. सोमवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी उत्तर भागातील जुन्नर, आंबेगाव, खेडसह दक्षिण जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, बारामतीत पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, अनेक दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तूट भरून काढण्यासह जलस्त्रोत भरण्यासाठी जिल्ह्यात दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी, पशुपालकांना मिळाला दिलासा
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आळेफाटा व परिसरातील गावांमध्ये मंगळवारी (दि. २२) दुपारनंतर पावसाने वादळवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावली. सुमारे सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे परिसरातील रस्ते, शेत व सखल भागात पाणी साचले होते. गेल्या दीड महिन्यापासून जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. गवतही सुकू लागल्याने शेतकरी व पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
पावसाची प्रतीक्षा करत काही ठिकाणी शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी उपलब्ध पाण्याचा आधार घ्यावा लागत होता. पावसाअभावी आळेफाटा, आळे, संतवाडी, कोळवाडी, पिंपरीपेंढार, पिंपळवंडी व परिसरातील अनेक गावांमध्ये खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, बाजरी, मका तसेच इतर खरीप पिकांपैकी काही पिके पूर्णपणे करपली असून उर्वरित पिके संकटात आली होती.
दरम्यान, सोमवारी रात्री नऊ वाजल्यानंतर परिसरात मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी दुपारनंतर पुन्हा पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येथे मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होणार आहे. तर उर्वरित खरीप पिकांना या पावसाचा चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. मात्र आधीच करपलेल्या पिकांना या पावसाचा फारसा फायदा होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.