

पुणे: जिल्ह्यात यंदाच्या 2025-26 हंगामात महात्मा गांधी राष्ट्रीय ग््राामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सुमारे चार हजार हेक्टरवर फळबागा लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सुमारे 1 हजार 350 हेक्टरवर म्हणजे उद्दिष्टाच्या 34 टक्के लागवड पूर्ण झालेली आहे. जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात सर्वाधिक फळबाग लागवड पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
तालुकानिहाय झालेली फळबाग लागवड हेक्टरम्धये पुढीलप्रमाणे आहे. भोर - 96.22, वेल्हा - 44.39, मुळशी - 83.55, मावळ - 50.14, हवेली - 23.9, खेड - 125.55, आंबेगाव - 134.22, जुन्नर - 210.53, शिरूर - 89.01, बारामती - 95.2 इंदापूर - 110.20, दौंड - 82.65, पुरंदर - 205.12 हेक्टरचा समावेश आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एकूण एक हजार 591 शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे.
रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या आता शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता फळबाग लागवडीकडे वाढण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल आंबा लागवडीकडे आहे. त्याखालोखाल नारळ, सीताफळ लागवडीसही प्राधान्य दिले जात आहे.
यंदा पाऊसकाळ ऑक्टोबर महिनाअखेरपर्यंत कायम राहिला. त्यामुळे फळबाग लागवड सुरुवातीच्या टप्प्यात संथ गतीने सुरू राहिली. आता शिवारात मुबलक पाणी उपलब्धता आहे. धरणांसह सध्या ओढे-नाले, तलाव, विहिरी पाण्याने भरलेल्या असून, जमिनीखालील पाणीपातळीही चांगली आहे.
त्यामुळे यापुढेही फळबाग लागवड सुरूच राहणार आहे. त्यामुळे उद्दिष्टांहून अधिक फळबाग लागवड मनरेगा योजनेतून पूर्ण करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही काचोळे यांनी सांगितले.