

वाडा: गेल्या दोन वर्षांपासून भीमा नदीवरील वाडा-साकुर्डी प्रवासी लाँचसेवा बंद असल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. या लाँचसेवेअभावी वाडा बाजारपेठेवरही गंभीर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत असून, वाडा ग््राामपंचायतीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मोरे आणि ग््राामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चास-कमान धरणाच्या जलाशयामुळे खेड तालुक्याचा पश्चिम भाग दोन भागांत विभागला गेला आहे. वाडा ही मोठी बाजारपेठ असून, येथे विविध शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिकांची ये-जा असते. नदीपलीकडील साकुर्डी, सुरकुंडी, माजगाव, चिखलगाव, देवोशी आदी गावांतील नागरिकांना वाडा येथे येण्यासाठी पर्यायी रस्त्याने मोठा फेरा घ्यावा लागत असून, खर्चही वाढतो.
यासाठी पंचायत समितीमार्फत जलवाहतुकीसाठी लाँचसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी लाँच जलाशयाच्या कडेला रात्रीच्या वेळी बुडाल्याने सेवा पूर्णतः बंद झाली आहे. दरम्यान, ही लॉंच पाण्याबाहेर काढून दुरुस्त करण्यात आली. काही दिवस वापर सुरू असताना ती परत नादुरुस्त झाली, त्यानंतर ती दुरुस्त झाली नाही.
विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी वाडा येथे येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाळद ते सुरकुंडी यादरम्यान भीमा नदीवर कोट्यवधी रुपये खर्चून भव्य पुलाची निर्मिती झाली असली, तरी साकुर्डी व परिसरातील गावांसाठी हा पूल लांब असल्याने आजही येथील नागरिक लाँचसेवेवर अवलंबून आहेत. यासंदर्भात वाडा ग््राामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत चास-कमान जलाशयात प्रवासी लाँच खरेदीसाठी 1 कोटी 40 लाख रुपयांची मंजुरी 20 सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप लाँच प्रत्यक्षात उपलब्ध न झाल्याने ग््राामस्थांमध्ये नाराजी आहे.
वाडा ग््राामपंचायतीच्या सरपंच रूपाली मोरे, उपसरपंच रोहिदास शेटे व सदस्य जाकीर तांबोळी, ज्ञानदेव सुरकुले, शिवाजी मोरे यांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून केवळ ’तारीख पे तारीख’ दिली जात असल्याचा आरोप केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मोरे यांनी लवकर निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशाराही दिला आहे.