

पुणे: सांगोलेचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेल्या प्रश्नातून राज्यात मंत्रालयासह शासनाच्या विविध विभागात तब्बल 3 लाख पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे संबंधित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी केला आहे.
राज्य शासनाच्या मंत्रालयासह विविध विभागातील तीन लाख पदे रिक्त असून, रिक्त पदांमुळे सध्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय, असल्यास, सद्यःस्थितीत राज्य शासनातील एकूण 7.19 लाख मंजूर पदांपैकी विविध संवर्गातील सुमारे दोन लाख 92 हजार 570 पदे रिक्त असून, नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या 5 हजार 289 इतक्या कर्मचाऱ्यांची संख्या यात समाविष्ट केली तर हा आकडा 2 लाख 92 हजार 859 इतका होणार असून, राज्य शासनातील तब्बल 35.83 टक्के पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे का, असल्यास, राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे न भरल्याने काही अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन पदांचा पदभार असल्यामुळे तसेच खालच्या पदावर नवी भरती न झाल्याने पदोन्नती होऊनही अनेकांना मागील दहा ते बारा वर्षे निम्न संवर्गातील पदावरच काम करावे लागत आहे, हे ही खरे आहे का, असल्यास, शासकीय सेवेतील पदे तत्काळ भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे. नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत? असा प्रश्न सांगोलेचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता.
याचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, सेवार्थ प्रणालीनुसार सद्य:स्थितीत राज्य शासनाच्या विविध विभागात 8 लाख 18 हजार 503 इतकी मंजूर पदे असून, 2 लाख 99 हजार 51 म्हणजेच 36.54 टक्के इतकी पदे रिक्त आहेत. शासनाने ऑगस्ट, 2022 ते नोव्हेंबर, 2025 या कालावधीत शासकीय, निम-शासकीय व अनुकंपा तत्त्वावर एकूण 1 लाख 20 हजार 232 इतक्या नियुक्त्या केल्या आहेत.
शासनातील संबंधित पदांवर पदभरती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, नवीन पदनिर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर पदोन्नती आणि सरळसेवा मार्गाद्वारे संबंधित प्रशासकीय विभागाकडून नियुक्त्या करण्यात येतात, असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागात तब्बल तीन लाख रिक्त पदे असल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. राज्यात जवळपास 30 लाखांपेक्षा जास्त उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. एवढ्या मोठ्या रिक्त पदांमुळे शासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण पडतो, सर्वसामान्य जनतेची कामे वेळेवर होत नाहीत, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना रोजगार मिळत नाही, यामुळे राज्यात बेरोजगारी वाढत आहे, रिक्त पदे तत्काळ भरावीत अन्यथा सरकारला येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही.
महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन