

Dhol Tasha Pathak for social welfare
पुणे: गेल्या वीस वर्षांत पुण्यातील ढोल - ताशा पथकांनी अंदाजे दहा कोटी रुपयांची विधायक कामे केली आहेत हे ऐकून आनंद होईल... हो, हे खरंय... ढोल-ताशा पथकांच्या वादनाचा गजर जसा गणेशोत्सवात ऐकू येतो, तसाच विधायक कामांमध्ये पाहायला मिळत आहे.
पुण्यात सुमारे 180 पथक आहेत, त्यातील सुमारे 70 टक्के पथकांकडून सामाजिक कार्य केले जात असून, पथक फक्त दहा दिवसांपुरते वादन करतात, हा समज पथकांनी मोडून काढला आहे. गणेशोत्सवातच नव्हे तर वर्षभर सामाजिक कामांचा वसा पथकातील वादक जपत आहेत, यंदाही सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ते सज्ज आहेत. (Latest Pune News)
पुण्याच्या गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे ढोल-ताशा पथके... गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या श्रीगणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची मिरवणूक असो वा विसर्जन मिरवणूक तसेच गणेशोत्सवातील दहाही दिवस... पथकांच्या वादनाचा गजर ऐकू येतोच... पण, आता वादनाच्या जोडीला पथकांनी विधायक कामे करण्यासह सुरुवात केली असून, उत्सवात मिळणार्या मानधनातील एका विशेष रकमेतून पथकांकडून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांना समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दै. ’पुढारी’ने पथकांकडून राबविण्यात येणार्या सामाजिक उपक्रमांबद्दल जाणून घेतले.
याविषयी ढोल- ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले, 2005 पासून ढोल- ताशा पथके ही सामाजिक कामांकडे वळली आहेत. गेल्या 20 वर्षांमध्ये पथकांनी वादनाच्या जोडीला विधायक कामांचाही विडा उचलला आहे. मिळणार्या मानधानातील बहुतांश रक्कम ही विधायक कामांसाठी खर्च केली जात असून, हा खूप चांगला बदल आहे. यातून पथकांविषयी एक चांगला विचार समाजात रुजत आहे.
नूमवि वाद्य पथकाचे अध्यक्ष यज्ञेश मुंडलिक म्हणाले, कोरोना काळात आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबविले. आताही सामाजिक उपक्रम सुरू असून, दहा गरजू विद्यार्थ्यांचा तीन वर्षांचा शैक्षणिक खर्च आम्ही करत आहोत. पथकात वादन करणारी तरुणाई विविध क्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक बांधीलकीचा वसा जपत ते उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.
पथकांकडून राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम
विविध सामाजिक संस्थांना आर्थिक मदत
गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणे.
रक्तदान, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिरे
गावांमध्ये जाऊन श्रमदान, दहीहंडी, वृक्षारोपण
आमच्या पथकाची सुरुवात 1999 साली झाली आणि पथकाचे यंदाचे 26 वे वर्ष आहे. वादनाच्या जोडीला पथकाकडून गेल्या काही वर्षांत सव्वा कोटी रुपयांची विधायक कामे करण्यात आली आहेत. आम्ही 200 विद्यार्थ्यांचा शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्याचा खर्च करत आहोत. दिवाळी सुटीमध्ये पथकातील वादक भोर, मावळ, वेल्हा, मुळशी, पुरंदर या तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये आयोजित शिबिरात श्रमदान करतात. आम्ही 26 गावांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सामाजिक उपक्रमांमुळे वादकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होत आहे.
- संजय सातपुते, अध्यक्ष, समर्थ प्रतिष्ठान
दहा दिवसांमध्ये आम्ही विविध मंडळांसाठी वादन करतो. पण, त्या जोडीला वर्षभर पथकाकडून सामाजिक उपक्रम राबविले जातात. गोशाळेला आर्थिक मदत, साहस फाउंडेशनला औषधांची मदत करण्यासह विद्यार्थी दत्तक योजनेअतंर्गत तीन शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च आम्ही करत आहोत. पथक हे पैसे कमावण्याचा भाग नव्हे, सामाजिक बांधिलकी जपणे हे पथकांचे काम असते. त्यादृष्टीनेच आम्ही काम करत आहोत.
- अॅड. राहुल नायर, अध्यक्ष, रुद्रगर्जना वाद्य पथक