खडकवासला: पानशेत-वरसगावसह टेमघर, खडकवासला धरणमाथ्यावर सोमवारी (दि. 28) सकाळपासून पावसाचा जोर ओसरला असला, तरी पानशेत-वरसगाव धरणखोर्यासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर संततधार सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
त्यामुळे सोमवारी (दि. 28) सायंकाळी सात वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 28 हजार 662 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. मुठा नदीला पूर येऊ नये, यासाठी जलसंपदा विभागासह प्रशासन गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात जागता पहारा देत आहे. (Latest Pune News)
सोमवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 26.56 टीएमसी म्हणजे 91.12 टक्के साठा होता. ’टेमघर’मधून 280 क्युसेक विसर्ग करण्यात आला. वरसगाव धरणातून 9 हजार 74 क्युसेक, तर पानशेतमधून 6 हजार 288 क्युसेकने खडकवासलात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सकाळी आठ वाजता 22 हजार 121 क्युसेक, दुपारी एक वाजता 25 हजार 696 क्युसेक, तर सायंकाळी सात वाजता 28 हजार 662 क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुठा नदीवरील शिवणे-नांदेड पुलाकाठचा बराच परिसर पाण्याखाली आला होता.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले की, पानशेत-वरसगाव धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. धरणसाठ्यात पाण्याची आवक वाढल्याने जादा पाणी खडकवासलातून सोडले जात आहे. मुठेला पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने जादा पाणी सोडून धरणांतील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यात येत आहे. धरणक्षेत्रासह मुठाकाठच्या रहिवाशांना वारंवार सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पानशेतसह वरसगाव खोर्यातील तव, शिरकोली, दासवे, ठाणगाव, घोडशेत, पोळे, धामण, ओहोळ, आडमाळ आदी ठिकाणी तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही.
24 तासांत सव्वा टीएमसी पाणी मुठापात्रात
रविवारी सायंकाळी पाच ते सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या 24 तासांत खडकवासला धरणातून जवळपास सव्वा टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत खडकवासलातून मुठा नदीत तब्बल 6. 71 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. सोमवारी दिवसभरात टेमघर येथे 12, वरसगाव येथे 15 , पानशेत येथे 14, तर खडकवासला येथे 3 मिलिमीटर पाऊस पडला.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता29.15 टीएमसी
सोमवारचा पाणीसाठा
26.56 टीएमसी (91.12 टक्के)