भीमाशंकर: बारापैकी सहावे असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे 3 लाख भाविकांनी दर्शन घेतले. या वेळी परिसरात सोमवारी (दि. 28) पहाटेपासूनच ‘हर हर महादेव’चा जयघोष आणि ‘बम बम भोले’चा गजर सुरू होता. दरम्यान, येथे श्रावणसरी कोसळत होत्या, तर परिसरात धुके दाटले होते. या अल्हाददायक वातावरणात भाविकांनी येथे दर्शनासह पर्यटनाचा आनंद लुटला.
उत्तर भारतातील श्रावण महिना व महाराष्ट्रातील भाविकांचा श्रावण महिना 25 जुलै ते 23 ऑगस्ट या काळात असतो. या काळात भगवान शंकराची विशेष आराधना केली जाते. त्यामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे जलाभिषेक, दुग्धाभिषेक, बेलपत्र वाहण्यासाठी मोठी गर्दी होते. (Latest Pune News)
व्रत, उपवास आणि साधनेचा हा काळ भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान, भीमाशंकर येथे शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी सुमारे 4 लाख भाविकांनी दर्शन घेतले.
महाराष्ट्रासह देशभरातील अनेक मंदिरांमध्ये या महिन्यात भक्तांची गर्दी वाढते. सोमवारी भगवान शंकराची पूजा करण्याचा विशेष योग असतो. येथे भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी रांग लावली होती. त्यामुळे लागणारा वेळ पाहून काही भाविक कळसाचे दर्शन घेऊन परतत होते. या गर्दीवर नियंत्रण व देखरेखीसाठी घोडेगाव पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत चोख बंदोबस्त ठेवला होता.