

पुणे: बनावट कंपनीमालकाचा डीपी वापरून व्हॉट्सॲप.वर संदेश पाठवत मोठ्या रकमेची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश पुणे सायबर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात तब्बल 1 कोटी 95 लाख रुपये आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले असून, दोन आरोपींना अटक केली आहे.
अजय रामविलास यादव (वय 22) व सलमान गौस मोहियुद्दीन अजनाल (वय 32, रा. कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांची नावे आहेत. सायबर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी नामांकित कंपनीच्या मालकाचा व्हॉट्सॲप डीपी वापरून ग््रााहकांशी संपर्क साधला. “पेमेंट थकले असून, तातडीने पैसे पाठवा,” असा विश्वासार्ह संदेश पाठवत पीडितांकडून विविध बँक खात्यांमध्ये रक्कम वळवून घेतली. या प्रकारात आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता.
तांत्रिक तपासात फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली बँक खाती कर्नाटकातील बेळगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सायबर पोलिस पथकाने सापळा रचून अजय रामविलास यादव (वय 22) व सलमान गौस मोहियुद्दीन अजनाल (वय 32) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन, बँक पासबुक व डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
आरोपींकडून आणखी काही आर्थिक फसवणूक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.नागरिकांनी व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा कॉलद्वारे येणाऱ्या पेमेंटसंदर्भातील संदेशांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करू नये तसेच संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक संगीतादेवी काटे, उपनिरीक्षक सुशील डमरे, पोलिस अंमलदार संदीप कणसे, प्रवीणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, शीतल डांगरे व अनिकेत भिंगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.