

पुणे: पोलिस हवालदाराने महिलेकडून अडीच लाखांहून अधिक रक्कम आणि सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निलंबित पोलिस हवालदार गणेश अशोक जगताप (वय 52, रा. कावेरीनगर पोलिस वसाहत, वाकड, पुणे) याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबबात कात्रज सुखसागरनगर येथील 43 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीदरम्यान घडला आहे.(Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जगताप याने फिर्यादी महिलेला डिसेंबर 2019 मध्ये पत्नीला कॅन्सर झाल्याचे आणि घरच्यांना कोरोनाचा त्रास झाल्याचे सांगत त्यांच्याकडून एक लाख रुपये उधार घेतले. त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये पुन्हा आर्थिक अडचणीचे कारण देत फिर्यादी यांच्याकडून सहा तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी घेतले.
पुढील काळात मुलीच्या शिक्षणासाठी म्हणून फोनपेच्या माध्यमातून 1.57 लाख रुपये घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. अनेक वेळा मागणी करूनही ना पैसे ना दागिने परत केले. यामुळे अखेर फिर्यादी महिलेने पोलिस आयुक्तालयाकडे आणि नंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जगताप याच्यावर चतु:शृगी पोलिस ठाण्यात एका महिलेचे 73 तोळे सोने आणि 17 लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा जुलै महिण्यात दाखल झाला होता. तसेच, पुण्यातील औंध भागात असलेल्या एका सराफी व्यावसायिकाकडून जगताप यांनी सोन्याचे दागिने खरेदी केले होते. त्याबाबत देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या घटनेमुळे विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप यांचे निलंबन केले होते.