

पुणे : पुण्यात मुली, नागरिकांना निर्भयपणे फिरता आले पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. गुन्हेगार कोणीही असू द्या, त्याला पाठीशी घातले जाणार नाही. पुणेकर जनतेची हीच अपेक्षा आहे. गुन्हेगारीमुक्त पुणे हेच धंगेकरांचे देखील म्हणणे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगताना रवींद्र धंगेकरांना महायुतीत दंगा नको, असा कानमंत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले. बाह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने शिंदे यांना ‘समाजस्नेही’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.(Latest Pune News)
गुंड नीलेश घायवळ प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच त्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही काही आरोप केले होते. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते.
याबाबत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत रवींद्र धंगेकरांशी बोलणं झालं आहे. धंगेकरांना सांगितले आहे की, महायुतीत दंगा नको. पण, त्यांनी सांगितले की, पुण्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये. सर्वसामान्य नागरिकांना भय वाटले नाही पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पोलिस आयुक्तांशी बोलणं झाले असून गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिस करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असून ते सक्षमपणे सांभाळत आहेत. जे कोणी गुंडगिरी करतील, बळाचा वापर करतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांबाबत बोलतांना शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. जो शब्द दिला तो आम्ही पाळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेऊन 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असेही ते म्हणाले.