पुणे : पुण्यातील उच्चभ्रू परिसरात त्यांनी रेकी करून घरफोड्या केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्याची संपूर्ण काळजी घेतली होती. विमानाने पुण्यात दाखल झाल्यानंतर मोबाईल न वापरत फेसबुकद्वारे एकमेकांना संपर्क केला. गुगलवर परिसराचा शोध घेऊन रात्रीच्यावेळी रेकी केली. पळून जाताना ठिकठिकाणी रिक्षा बदलले. मात्र, थांबलेल्या लॉजवर त्यांनी दिलेली कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली अन् त्याच्या हातात बेड्या पडल्या.
हैदराबादमधील चोरट्याला येरवडा आणि चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली. चोरट्याने चतु:शृंगी आणि येरवडा भागातील उच्चभ्रू सोसायटीतून 60 लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पसार झालेल्या चोरट्याचा सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे माग काढून त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली. नरेंद्र बाबू नुनसावत (वय 27, रा. मीर पेठ, हैदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सतीश बाबू करी (वय 35, रा .हैदराबाद) पसार झाला आहे. नरेंद्रविरुद्ध तेलंगणा, हैदराबाद, तिरुपती पोलिस ठाण्यात 25 गुन्हे दाखल आहेत.
येरवडा आणि चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीत नरेंद्रने घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली. कल्याणीनगर भागात बंद बंगल्यात शिरून आरोपी नरेंद्र आणि त्याचा साथीदार सतीशने दहा लाखांचे दागिने आणि रोकड चोरून नेली होती. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. गणेशखिंड रस्त्यावरील भोसलेनगर परिसरात दोन घरफोड्या झाल्या होत्या. चोरट्यांनी 50 लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. येरवडा पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता.
चोरट्यांनी जवळपास 300 ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांनी केलेले चित्रीकरण पडताळले होते. अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, अमजद शेख, अनिल शिंदे, प्रशांत कांबळे, किरण घुटे, सूरज ओंबासे, सागर जगदाळे, श्रीकांत वाघोले, इरफान मोमीन, ज्ञानेश्वर मुळे, प्रदीप खरात यांनी ही कामगिरी केली.
आरोपी नरेंद्र आणि सतीशविरुद्ध तेलंगणा आणि आंध— प्रदेशात घरफोडीचे प्रत्येकी 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत. आरोपी नरेंद्र एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो तेलंगणात चालक म्हणून काम करत होता. पोलिस भरतीसाठी तो प्रयत्न करत होता. पोलिस भरतीत तो उत्तीर्ण झाला होता. चारित्र्य पडताळणीत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न भंगले.
नरेंद्र आणि सतीश घरफोडी करण्यासाठी पुण्यात आले होते. दोघांनी स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. घरफोडी केल्यानंतर ते रिक्षा बदलून भारती विद्यापीठ परिसरात गेले. तेथून ते पुन्हा हॉटेलमध्ये परतले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी पाच रिक्षा बदलल्या. सीसीटीव्ही चित्रीकरणात पकडले जाण्याची भीती वाटल्याने त्यांनी रिक्षा बदलून प्रवास केला.
सतीश करी हा मुख्य सूत्रधार असून, त्याने नरेंद्र नुुनसावत याच्यासोबत मिळून या घरफोड्या केल्या आहेत. नरेंद्रला अटक करण्यात आली असून, चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिवसा रेकी करून चोरट्यांनी रात्रीच्यावेळी या घरफोड्या केल्या आहेत.
– बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा.
हेही वाचा