पुणे : पुढारी वृत्तसेवा : जावयाने सासूच्या पोटात चाकूने भोसकून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. पती आणि पत्नीत कौटुंबिक कारणातून वाद झाल्यानंतर, पत्नीने पतीच्या विरोधात पोटगी आणि मुलीचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयात केस दाखल केली होती. ही केस मागे घे, असे म्हणत पतीने पत्नीस मारहाण करून, सासूवर खुनी हल्ला केला. अलका गवळी असे जखमी झालेल्या सासूचे नाव असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी संग्राम बळवंत शिंदे (वय 38, रा. मोडनिंब, ता. माढा, सोलापूर) या आरोपीला अटक केली आहे. याबाबत रूपाली संग्राम शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (दि.13) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नायगाव परिसरातील आदर्श कॉलनीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम शिंदे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून, कौटुंबिक कारणातून पती-पत्नीत वाद आहेत. त्यामुळे त्याची पत्नी रूपाली ही माहेरी नायगाव येथे राहण्यास आली होती.
त्या वेळी पती त्या ठिकाणी येऊन त्याने पत्नीला 'पोटगी व मुलीचा ताबा मिळवण्याबाबतची केलेली केस मागे घे' असे म्हणाला; परंतु पत्नीने त्यास 'आता जे काही होईल ते कोर्टात होईल,' असे सांगितले. त्यावर त्याला राग आल्याने त्याने टिफिनच्या पिशवीतून आणलेला धारदार चाकू बाहेर काढून पत्नीला तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत तिच्या अंगावर धावून गेला. पत्नीला तो मारहाण करत असताना पत्नीची आई अलका गवळी या मधे पडल्या. त्या वेळी 'तुझ्यामुळेच सगळं होत आहे, तूच केस मिटवू देत नाही, तुलाच खल्लास करतो,' असे म्हणत आरोपीने त्याच्याजवळील धारदार चाकूने सासूच्या पोटात चाकू घुसवला. यात जखमी झालेल्या सासूवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एन. घोडके पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा