चीनमध्ये पाण्याखाली सहाशे वर्षे जुने शहर | पुढारी

चीनमध्ये पाण्याखाली सहाशे वर्षे जुने शहर

बीजिंग : जगभरात अनेक शहरे पाण्याखाली गेलेली आहेत. आपल्याकडील प्राचीन काळातील द्वारकेचे मोठे उदाहरण यासाठी देता येऊ शकते. अशा पाण्याखालील शहरांचे अवशेष वेळोवेळी पुरातत्त्व संशोधकांकडून शोधले जात असतात. चीनमध्येही सहाशे वर्षांपूर्वीचे एक शहर धरणामुळे निर्माण झालेल्या सरोवराच्या पाण्याखाली आहे. झेजियांग प्रांतातील शिचेंग शहराचे हे अवशेष आहेत.

शिचेंगमध्ये 1959 मध्ये शिनान जलविद्युत प्रकल्पाच्या धरणाच्या कामावेळी पूर आला होता. त्यावेळी सुमारे तीन लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. अनेक दशके लोक याबाबतच्या गोष्टी विसरूनच गेले होते. 2001 मध्ये या सहाशे वर्षांपूर्वीपासून वसलेल्या शहराचे अवशेष पाहण्यासाठी शोधमोहीम राबवली. त्यावेळी हे अवशेष अजूनही सुरक्षित असल्याचे दिसून आले. मिंग आणि किंग राजवटीतील राजांनी हे शहर वसवले होते. त्यांनी सन 1368 ते 1912 या काळात तिथे राज्य केले.

वू शी माऊंटन जवळ असल्याने शिचेंगला ‘लायन सिटी’ असेही म्हटले जात असे. ‘वू शी’चा मँडेरिन भाषेतील अर्थ पाच सिंहांचा पर्वत. या सरोवरातील खोल पाण्यात अद्यापही सुंदर नक्षीकाम, कोरीवकाम असलेल्या दगडांच्या भव्य इमारती सुस्थित उभ्या आहेत. या शहराला पाच प्रवेशद्वार होते. रुंद रस्ते अनेक चौक असलेल्या या शहरात सिंह, ड्रॅगन, फिनिक्स तसेच ऐतिहासिक शिलालेखांच्या अनेक कलाकृती होत्या. आजही या कलाकृती तिथे सुरक्षित आहेत.

Back to top button