Pune Crime News : तेजस मोरेसह कुटुंबीयांवर गुन्हा

Pune Crime News : तेजस मोरेसह कुटुंबीयांवर गुन्हा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सुसगाव – बावधन- पाषाण येथील प्रकल्पांमध्ये तब्बल 1 कोटी 8 लाख 67 हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडून ठरलेल्या रकमेवर परतावा न देता फसवणूक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस रवींद्र मोरे, पत्नी जिज्ञासा, आई जयश्री, वडील रवींद्र मोरे (सर्व रा. सुमित अपार्टमेंट, अल्टा माउंट रोड, मुंबई तसेच जळगाव) आणि मेहुणे राहुल जैन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत विकास कामेश्वर सिंग (46, रा. येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत असताना त्यांना तेजस मोरे भेटला आणि बिझनेस लोनबाबत विचारणा केली. परंतु, सिंग यांनी त्याला 'आयटीआर' चांगला नसल्याने बिझनेस लोन मंजूर होणार नाही, असे सांगितले. यानंतर 2017 मध्ये सिंग आणि तेजस यांची चांगली मैत्री झाली. सिंग हे कल्याणीनगर येथील त्यांच्या शाखेत असताना त्यांना तेजस आणि जिज्ञासा येऊन भेटले. त्यांनी सिंग यांना त्यांच्या सुसगाव – बावधन येथील बांधकामाच्या ठिकाणी एस. एम. इंटरप्रायझेस येथे बोलवले.

त्यांनी सिंग यांना बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास वर्षाला 24 टक्के व्याज मिळेल, असे आमिष दाखविले. तसेच सिंग यांना प्रकल्पातील दोन सदनिकांच्या विक्रीमध्ये सवलत देईन, असे सांगितले. दरम्यान, काही दिवसांनंतर पाचही जण सिंग यांच्या कार्यालयात गेले. तेथे पुन्हा त्यांना गुंतवणुकीबाबत आमिष दाखविण्यात आले. तेजस आणि त्याच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार जानेवारी 2018 पासून सिंग यांनी वेळोवेळी तब्बल 1 कोटी 8 लाख 67 हजार रुपये गुंतवणूक करण्यासाठी दिले. त्यावर 2018 पर्यंत त्याने काही रक्कम परत दिली. मात्र, त्यानंतर रक्कम दिली नाही आणि मुद्दलही परत दिले नाही.

वारंवार पैसे देण्याबाबत तगादा लावल्यानंतर तेजस याने सिंग यांना 14 ऑक्टोबरला 1 कोटी 38 लाखांचा धनादेश दिला. मात्र, खात्यात रक्कम नसल्याने त्यांनी धनादेश बँकेत भरला नाही. दरम्यान, राष्ट्रीयीकृत बँकेची 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचेही सिंग यांना समजले. पैशाची मागणी करत असल्याने त्याच्या घरच्यांनी सिंग यांची भेट घेऊन पैसे परत करण्यास वेळ मागितला. मात्र, तेजसच्या प्रकल्पात पैसे गुंतविण्यासाठी सिंग यांनी टॉपअप होम लोन, पर्सनल लोन, गोल्ड लोन घेतले होते.

तेजस याने पैसे न दिल्याने सिंग यांना अधिकचे व्याज भरावे लागले. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झाली. त्यांचे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. याबाबत 28 डिसेंबर 2019 रोजी सिंग यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे तेजस मोरे ?

तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील घड्याळ्यात छुपा कॅमेरा लाऊन स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर तेजस मोरे हा चर्चेत आला होता. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आलेल्या आरोप प्रकरणी भोईटे गटावर पडलेल्या धाडी संदर्भातील एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्टिंग ऑपरेशनसंदर्भातील एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला होता. फडणवीसांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news