

पुणे : अंगात दैवी शक्ती आहे, अशी बतावणी करीत एका भोंदूने विवाहित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिच्याकडून तब्बल 50 लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी औदुंबर मनोहर गडदे (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पीडित 42 वर्षीय महिला कौटुंबिक वादामुळे पतीपासून वेगळी राहात होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत गडदेने स्वतःला देवऋषी असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. तुमच्या अडचणी दूर करतो, जीवन सुरळीत करतो, अशी गोड बोलणी करीत त्याने महिलेला जाळ्यात ओढले. यानंतर स्वारगेट परिसरातील लॉजवर बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
एवढ्यावरच न थांबता माणगाव येथेही तिला नेऊन पुन्हा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. नोकरी लावतो, बांधकाम व्यवसायात मोठा फायदा करून देतो, या आमिषाखाली आरोपीने महिलेकडून वेळोवेळी 50 लाख 55 हजार रुपये उकळले. काही रक्कम रोख, तर काही दागिन्यांच्या स्वरूपात घेतल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार तब्बल पाच ते सहा वर्षे सुरू होता.