

Pune Court Firing: पुण्यातील शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयाच्या परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आणि नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या मंदार किवळे याच्यावर सहा जणांच्या टोळीने हल्ला केला. आधी गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने वार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंदार किवळे हा आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तो चार दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. न्यायालयातील काही कामासाठी तो शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या परिसरात आला होता. त्याचवेळी काही जणांनी त्याला लक्ष्य केले. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी दाखल झाले. जखमी मंदार किवळे याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला तीन ते चार जणांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, हल्लेखोरांची नेमकी संख्या आणि त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गेल्या वर्षी कात्रज परिसरात शुभम चव्हाण याची हत्या झाली होती. या हत्येचा आणि आताच्या हल्ल्याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला.
यावर पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांची ओळख पटवणे, त्यांनी हा हल्ला का केला आणि त्यांचा मागील वर्षीच्या घटनेशी काही संबंध आहे का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या हल्ल्यामागचे नेमके कारण स्पष्ट होईल.
दरम्यान, जखमी मंदार किवळे याची प्रकृती आणि त्याच्या मृत्यूबाबत विचारले असता, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
पुण्यातील न्यायालयाच्या परिसरात हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. २०१७ पासून अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे वकील, पक्षकार आणि न्यायालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
न्यायालयाच्या परिसरात अनेकदा गंभीर गुन्ह्यांतील आरोपी, त्यांचे विरोधक आणि विविध प्रकरणांशी संबंधित व्यक्ती येत असतात. अशा ठिकाणीच गोळीबार आणि कोयत्याने हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.