

पुणे: वाहतूक कोंडीला सायकल ट्रँक जबाबदार..., फूटपाथ कमी करून ती जागा वाहतुकीला दिली की वाहतूक कोंडी कमी होईल..., पथारीवाल्यांचे पुनर्वसन करून ती जागा वाहतुकीला खुली करणार..., पार्किंगला जादा जागा शोधणार... शहरातील वाहतूक कोंडीच्या उग्र समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका असे एकाहून एक अक्कलशून्य उपाय योजणार आहे. ते ऐकल्यावर प्रश्न पडतो... ही म्युनिसिपालिटी आहे का उलटीपालटी... ?
शहरात वाहतूक कोंडी नेमकी कशामुळे होते, त्याची प्रत्यक्ष पाहणी करून (आता अप्रत्यक्ष पाहणी असा वेगळा प्रकार असतो का ?) उपाय सुचवण्यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांची पथके स्थापन करण्यात आली होती. त्यांच्या अहवालामध्ये एकापेक्षा एक तारे तोडण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कनिष्ठ आणि मध्यम पातळीवरील या अभियंत्यांचे हे बाळबोल अतिवरिष्ठ आणि वाहतुकीच्या समस्येचा आवाका असल्याचे मानले जाणाऱ्या अनुभवी अधिकाऱ्यांनाही मान्य आहेत.
आता कायकाय उपाय या समित्यांनी सुचवले आहेत ? आणि ते खरोखरीच योग्य आहेत का ? या अहवालातील काही मोजक्या उपायांचाच आपण समाचार घेऊ.
महापालिकेच्या सुविद्य अभियंत्यांचा अहवाल म्हणतो... मोठे पदपथ हे वाहतुकीच्या कोंडीला कारणीभूत आहेत आणि ते छाटून कमी केल्याने रस्ते मोठे होऊन वाहतुकीची कोंडी फुटेल. या उपायाला काय म्हणावे ? आतापर्यंत जी महापालिका स्ट्रीट फर्निचर या नावाने मोठे फूटपाथ करून तेथे पादचाऱ्यांना बसण्यापासून ते सायकल चालवण्यापर्यंतच्या सुविधा देण्याच्या बाता करीत होती आणि नुसत्याच बाता करत नव्हती तर फर्ग्युसन, जंगली महाराज आदी रस्त्यांवर असे मोठे फूटपाथ करून या सुविधा तिने दिलेल्याही असून त्यांचा उपयोग पुणेकर करीतही आहेत. असे असताना आता छोटे फूटपाथ करण्याची उलटी गंगा पुन्हा वाहावी, असा खटाटोप होणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे रस्ते रूंद केल्याने वाहतूक कोंडी कमी होते, हा जावईशोध आहे. रूंद केलेल्या रस्त्यांवर कोंडी होण्यासाठी आणखी वेगाने नवी वाहने रस्त्यावर येतात. रूंद रस्त्यांवर कायदेशीर-बेकायदेशीर पार्किंग बिनदिक्कतपणे होते तसेच पथारीवालेही मांडी ठोकतात...
वाहतूक कोंडीला सायकल ट्रँक जबाबदार असतात, असे महापालिकेच्या अभियंत्यांचे (सुविद्य आदी) दुसरे निरीक्षण आहे. मोटारविहीन वाहतूक म्हणजेच नॉन मोटराईज्ड ट्रान्सपोर्ट- एनएमटी- या संकल्पनेचा जप याच महापालिकेचे हेच अधिकारी आतापर्यंत करत होते. परदेशातले सायकल ट्रँक कसे चांगले आहेत, कोट-टाय घातलेले श्रीमंत नागरिकही सायकल कसे वापरतात, याचे रसभरीत वर्णन परदेशवारी केलेल्या (काही वेळा महापालिकेच्या शिष्टमंडळाने-पथकाने दिेलेल्या भेटीसह) अधिकाऱ्यांकडून पुणेकरांनी ऐकले आहे. त्यातूनच काही शे किलोमीटरच्या सायकल ट्रँकची योजना आखण्यात आली आणि ती अत्यंत घाणेरड्या पद्धतीने राबवण्यात आली. हे सायकल ट्रँक खंडित स्वरूपात आहेत, त्यापैकी अनेकांवर नाना प्रकारांची अतिक्रमणे झालेली आहेत. जे शिल्लक आहेत, त्यावरून महापालिकेच्या आयुक्त आणि इतर अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी सायकल चालवून दाखवावी. त्यांच्या मणक्याचे टाके ढिले झाले नाहीत, तर पुणेकर तंदुरूस्तीबद्दल या अधिकाऱ्यांचा जाहीर सन्मान करतील.
आता कोणत्या तरी सायकल स्पर्धेच्या निमित्ताने हे ट्रँक सुस्थितीत आणण्याऐवजी आणि त्यांचे जाळे वाढवण्याऐवजी स्वतंत्र ट्रँक रद्द करून फक्त त्यांना रंग फासला जाणार आहे. तसेच सायकलींसाठी गतिरोधकांची म्हणजे स्पीड ब्रेकरची संख्या दोनशेने कमी केली जाणार आहे. हे करून निष्कर्ष काय तर वाहतूक कोंडीला सायकल ट्रँक जबाबदार आहेत... याला अकलेचे दिवाळे म्हणायचे नाही तर काय म्हणायचे ते तुम्ही सांगा... ?
आता कपाळावर हात मारावासा वाटेल, असा यांचा (त्याच त्या पथकांचा) निष्कर्ष ऐका...
त्यांचा अहवाल म्हणतो की पथारीवाल्यांचे पुनर्वसन करून ती जागा वाहतुकीला खुली करणार... एकतर पथारीवाले व्यावसायिकांवर एकदा कारवाई करून ती जागा रिकामी केली की अवघ्या काही तासांतच तिथे पुन्हा अतिक्रमण होते, हा पुणेकरांचा अनुभव आणि महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा परिणाम. रिकाम्या झालेल्या जागेचा ताबा एकतर दुसरे व्यावसायिक घेतात किंवा ती जागा पार्किंगसाठी वापरली जाते.
पार्किंगसाठी आणखी जागा शोधण्याची मोहीम हाती घेण्याची घोषणाही या अहवालानंतर प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पार्किंगसाठी कितीही जागा उपलब्ध करून दिली तरी रोज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर ओतल्या जात असलेल्या नव्या खासगी वाहनांच्या वेगापुढे ती अपुरी ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. पार्किंगसाठी जादा जागा दिल्यास नवी वाहने विकत घेण्याचा वेग वाढून पुन्हा कोंडीत भर पडेल. पार्किंगला आणखी जागा देणे म्हणजे आग लागली असता पाण्याऐवजी पेट्रोल टाकण्यासारखे ठरेल.
वाहतूक कोंडीवर सर्वात महत्त्वाचा उपाय आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे. खासगी वाहनांचे प्रमाण कमी करणे, एकूण वाहतुकीत सार्वजनिक वाहतुकीचा टक्का वाढवणे. सायकलींचा वापर वाढवला पाहिजे. सायकल ट्रँकचे शहरभर जाळे केल्यास अपघातांच्या भीतीविना पुणेकरांना सायकलीवरून प्रवास करता येईल. भाडेतत्त्वावरील सायकलींची चांगली योजना पुण्यात मूळ धरू लागली असताना तिच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले नाही आणि तिचे मातेरे करून टाकले. हे टाळायला हवे आणि डोके वापरून वाहतूक कोंडीवर योग्य उपाय योजायला हवेत. महापालिका हे लक्षात घेणार आहे का ?....