बिबवेवाडी : मार्केट यार्ड येथील शिवनेरी पथावरील शिवाजी पुतळा (मॅफेको) ते नवीन फुलबाजारापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ‘पे अँड पार्क’ची वसुली केली जात आहे. अतिशय वर्दळ असलेल्या या रस्त्यावरील सशुल्क पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शिवाय येथील पीएमपी बसस्टॉपवर बस थांबवायलाही जागा मिळताना दिसत नाही. त्यामुळे हे पार्किंग बंद करावे, अशी मागणी प्रवाशांसह वाहनचालकांकडून होत आहे.
शिवनेरी पथ हा रस्ता महापालिकेचा आहे. त्याची देखभाल व दुरुस्ती महापालिकेकडून केली जाते. या पथावर मार्केट यार्ड भाजी मार्केट बसस्थानक आहे. बाजार समितीकडून येथे करण्यात आलेल्या पे अँड पार्कमुळे अगदी बसस्थानकानजीक वाहने पार्क होतात. त्याचा त्रास येथून मार्गस्थ होणार्या पीएमपी प्रवाशांसह वाहनचालकांना होत आहे.
मात्र, याकडे दुर्लक्ष करून नेमण्यात आलेले ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी फक्त वसुलीचे टार्गेट साध्य करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ’अशा पद्धतीने नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न बाजार समिती प्रशासनाकडून होत आहे. या पे अँड पार्कच्या वसुलीला लगाम कोण घालणार, असा प्रश्न उपस्थित होत असल्याची भावना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बसवराज गायकवाड यांनी व्यक्त केली.