Pune Civic Issue: रामराम सर.. ऐकायला खूपच चांगले, छान वाटले... पण प्रत्यक्ष स्थिती काय आहे?
सुनील माळी
मा. नवलकिशोर राम सर, रामराम...
पुण्यासारख्या मोठी (जाज्ज्वल्य वगैरे) परंपरा असलेल्या आणि त्या परंपरेएवढ्याच जटील, गुंतागुंतीच्या समस्या असलेल्या महानगराच्या नागरी सुविधांची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आपण स्वीकारली आणि त्यानंतर (आतापर्यंत) धडाक्याने काम सुरू केल्याचे, आमच्या कानी रोज येणाऱ्या घोषणांवरून लक्षात येते. त्यातली एका घोषणेचे ध्वनी विरतात न विरतात तोच दुसरी घोषणा होते आणि त्यानंतर लगोलग तिसरी.
पुण्याच्या वाहतुकीपासून ते कचऱ्यापर्यंतच्या आणि तुंबणाऱ्या नाल्यांपासून ते थोडक्या पावसाने चाळणी होणाऱ्या रस्त्यांपर्यंतच्या समस्यांवर आपण सहजी उपाय सुचवून तसे आदेश दिल्याची वृत्ते देतादेता माध्यमांची चांगलीच धांदल उडते आहे, पण रोजच्या रोज नव्या बातम्या मिळतअसल्याने ती खूशही आहेत. त्याचबरोबर आता आपल्या प्रश्नांची तड लागणार,अशी (भोळी) आशा इथल्या (भाबड्या) नागरिकांच्या मनात जागी होऊन रूंजी घालू लागली आहे.
परंतु या भाबड्या नागरिकांमध्ये न मोडणाऱ्या आणि पुण्याच्या समस्या, त्यावर आतापर्यंत करण्यात आलेल्या उपायांची लागलेली वासलात तसेच नेमके काय करायला हवे ?, याची अचूक नसली तरी ढोबळमानाने योग्य दिशेची जाण असणाऱ्या काही अस्सल पुणेकरांच्या मनातले निवडक मुद्दे या पत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचे पोस्टमनचे काम तूर्त आमच्यावर आले आहे. तरी राग न मानून घेता या मुद्द्यांचा आपण विचार कराल, अशी आशा(यावेळी भोळी नव्हे...) आहे...
आदरणीय राम सर, आपण दोनच दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना पुण्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चिंता व्यक्त केली,' पथ विभाग आणि सांडपाणी वाहिन्यांची जबाबदारी असलेला विभाग (ड्रेनेज विभाग असाच शब्द सध्या सर्रास वापरला जातो) यांच्यात समन्वय नसल्याने खड्ड्यांचा प्रश्न उभा ठाकतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी रस्ते तयार करतानाच ड्रेनेजची कामेकेली जातील', अशी घोषणाही आपण केलीत.
साहेब, ऐकायला खूपच चांगले, छान वाटले... पण प्रत्यक्ष स्थिती काय आहे ?...कोणताही रस्ता नव्याने केली की त्यानंतर काही दिवसांतच ड्रेनेजसाठी तो खणला जातो आणि डांबरीकरण खराब झाल्याने खड्डे पडतात, हे खरेच आहे, तथापि हे सत्य म्हणजे नवे आयुक्त दाखल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला झालेला साक्षात्कार नव्हे तर गेल्या तब्बल पन्नास वर्षांपासून पुणेकरांना असलेली ही माहिती आहे. केवळ ड्रेनेजच नव्हे तर दूरध्वनीच्या केबल, पिण्याच्या पाण्याची वाहिनी अशा विविध सेवावाहिन्या रस्ता करण्याआधीच रस्त्याच्या कडेला घ्यायच्या आणि मग डांबरीकरण करायचे, अशा डांबरीकरणाला धक्का न लागल्याने तो रस्ता अनेक वर्षे टिकतो. याचे उदाहरण म्हणून कायमच सत्तरीच्या दशकात केलेल्या जंगली महाराज रस्त्याकडे बोट दाखवण्यात येते.
त्यानंतरच्या पन्नास वर्षांत काही मोजके रस्ते तशा म्हणजे जंगली महाराज रस्त्याप्रमाणेच तयार करण्यात आले तरी इतर बहुतांश पुण्याची रड तशीच आहे. त्यानंतर गेल्या काही वर्षांपूर्वी डांबरी रस्त्यांच्या ऐवजी सिमेंटचे रस्ते करण्याची टूम का कोणजाणे, पण निघाली. डांबरी रस्ते पाण्याने खराब होतात, सिमेंटच्या रस्त्यांवर पाण्याचा काही परिणाम होत नाही, ते खूप टिकतात, वगैरे तत्त्वज्ञान ऐकवण्यात आले आणि गल्लीबोळापर्यंतचे रस्ते सिमेंटचे करण्याची कामे सुरू झाली. अर्थात 'त्यासाठी सर्व सेवावाहिन्या बाजूला घेणार आहोत. त्यामुळे पुन्हा ड्रेनेज आदीसाठी खणावे लागले तरी ते रस्ते खणले जाणार नाहीत,' असेही सांगण्यात आले. प्रत्यक्षात काय झाले ?
टेंडर काढण्याच्या, त्यावरच्या टक्केवारीचा मलिदा लवकर घशाखाली उतरवण्याच्या घाईत या वाहिन्या बाजूला घेण्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाले. परिणाम ? काही वर्षांनी जेव्हा रस्त्याखालच्या ड्रेनेज आदी वाहिन्यांची कामे निघाली तेव्हा चक्क सिमेंटचे रस्ते फोडण्यात आले. काम झाल्यावर त्यावर अंथरलेला सिमेंटचा थर हा ठिगळासारखा होऊन वाहनचालकांचे हाल सुरूच राहिले. अनेक रस्त्यांवर कडेला पाणी वाहून जाण्यासाठी पन्हाळीसारखी जागाच न ठेवल्याने या सिमेंटच्या रस्त्यावर पाण्याची तळी निर्माण झाली.
राम सर, सेवा वाहिन्या बाजूला करून सिमेंटचे रस्ते केल्याच्या थापा मारणाऱ्या त्या वेळच्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का ? जोपर्यंत ती होत नाही आणि सर्व रस्त्यांचे डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करण्याआधी वाहिन्या बाजूला घेण्याचे काटेकोर नियोजन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ''रस्ते तयार करणे आणि सांडपाणी वाहिन्या टाकणे ही दोन्ही कामे एकच विभाग करेल, अशा सूचना दिल्या आहेत'', या तुम्ही केलेल्या विधानाला काय अर्थ उरेल?...
मा. राम सर, दुसरा मुद्दा रस्त्यावर फेकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा. शून्य कचरा योजनेत कचरा पेट्या किंवा कुंड्या काढून घरोघर जाऊन ओला-सुका कचरा गोळा करणारी यंत्रणा सुरू करण्यात आली. तरीही त्या कचरा पेट्यांच्या जागांवर तसेच इतरही मोक्याच्या ठिकाणी रात्री सर्रास कचरा फेकला जातो आहे आणि दुसऱ्या दिवसभरात महापालिकेची गाडी येऊन तो उचलेपर्यंतची दुर्गंधी आणि अनारोग्याचा प्रश्न पुणेकरांना सहन करावा लागतोच आहे. ''मुख्य रस्ते सकाळीच झाडून त्यावरचा कचरा उचलला जाणार,'' अशी तुमची घोषणा झाली खरी, पण शहरातल्या उपरस्ते दुपारपर्यंत दुर्गंधीनेच माखलेले राहात आहेत. त्याचे काय ? तसेच घरोघर जाऊन कचरा उचलण्याची यंत्रणा अपुरी पडते आहे का, याप्रश्नाचे काय ?...
आयुक्तसाहेब, समस्या अनेक आहेत. इतर समस्यांबाबत पुन्हा कधीतरी बोलू. विस्तारभयास्तव तूर्त इथेच थांबतो. या समस्या सोडवण्यासाठी शिस्तबद्ध आणि कालबद्ध कार्यक्रम राबवावे लागणार आहेत आणि त्यासाठी लागेल ते खंबीर प्रशासन. ते आपण द्यावे, ही नम्र विनंती.
आपला करदाता,
एक पुणेकर.

